नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख म्हणून राज्याचे ऊर्जा व उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शनिवारी रात्री मुंबई येथे बावनकुळे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
बावनकुळे हे सध्या नागपूर तसेच वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे त्यांना तीन जिल्ह्यांत प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव आहे. पूर्व विदर्भातील त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्याचा फायदा येत्या निवडणुकीत भाजपला होण्यासाठी पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांतील 32 विधानसभा मतदारसंघांची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज भरताना, केंद्रीयमंत्री नितीन गडकरींसह चंद्रशेखर बावनुकळेही हजर होते. त्यामुळे, बावनकुळेंना मोठी जबाबदारी देण्यात गडकरींची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगण्यात येतंय.