सा. रे. पाटील यांचे निधन

By admin | Published: April 2, 2015 01:19 AM2015-04-02T01:19:13+5:302015-04-02T01:26:27+5:30

मरणोत्तर देहदान : सहकार, राजकारणातील ज्येष्ठ नेता हरपला

Bit Ray Patil dies | सा. रे. पाटील यांचे निधन

सा. रे. पाटील यांचे निधन

Next

शिरोळ : ज्येष्ठ समाजवादी आणि सहकार चळवळीतील जाणकार माजी आमदार डॉ. सातगोंडा रेवगोंडा ऊर्फ सा. रे. पाटील यांचे बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास बेळगावच्या केएलई रुग्णालयामध्ये मेंदूच्या विकाराने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. त्यांच्या निधनाने शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात गेली ७० वर्षे सहकार आणि शेतीशी घट्ट नाते असलेला ज्येष्ठ नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांना २४ फेब्रुवारीला मेंदूच्या विकारावरील उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. सकाळी सातच्या सुमारास डॉ. पाटील यांच्या निधनाची बातमी शहरात पसरली. येथील अजिंक्यतारा हौसिंग सोसायटीतील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. निधनानंतर त्यांचे पार्थिव बेळगावहून थेट मिरजमार्गे जांभळी येथे मूळगावी आणण्यात आले. तेथे काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर ते कोंडिग्रे येथील श्रीवर्धन बायोटेक येथे आणले. तेथून जयसिंगपूर येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. तेथे लिंगायत धर्माप्रमाणे पार्थिवावर विधी झाला. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या वाहनामध्ये पार्थिव ठेवण्यात आले. पार्थिवाजवळ बंधू आण्णासाहेब पाटील, पुत्र गणपतराव पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील बसले होते. ‘अमर रहे... अमर रहे, सा. रे. पाटील... अमर रहे’ अशा घोषणा देत अत्यंयात्रा निघाली. अंत्ययात्रेत महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील मान्यवर उपस्थित होते. शहरातील प्रमुख मार्गावरून शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर दुपारी एकच्या सुमारास पार्थिव आणण्यात आले.
दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर पार्थिव आणल्यानंतर उपस्थित जनसागराला अश्रू अनावर झाले. कारखान्याच्या मुख्य मिलमध्ये कामगारांच्यावतीने डॉ. पाटील यांना श्रद्धांजली वाहीली. त्यानंतर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत पार्थिव अत्यदर्शनासाठी ठेवले होते. दत्त उद्योगसमूहाचे अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, सभासदांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर या जनसागराचे रूपांतर शोकसभेत झाले. हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष भरत लाटकर, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, भाई वैद्य, माजी आ. प्रा. शरद पाटील, खासदार प्रकाश हुक्केरीे, माजी आ. बजरंग देसाई, माजी मंत्री जयवंतराव आवळे, विनय कोरे, के.एल.ई हॉस्पीटल बेळगावचे प्रमुख अमित कोरे, माजी आ. के. पी. पाटील, माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे, राजू आवळे, रजनीताई मगदूम, एम. एस. गवंडी, जिल्हाधिकारी राजाराम माने, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, तहसिलदार सचिन गिरी, पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, सर्जेराव शिंदे, सरपंच सुवर्णा कोळी, उपसरपंच पृथ्वीराज यादव, कामगार संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब भोसले यांच्यासह हजारोंनी दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी साडेतीनला पाटील यांचे पार्थिव मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात दिले.



असाही योगायोग
सा. रे. पाटील यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव होता. आपल्या ७0 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात या विचारांनीच त्यांनी वाटचाल केली. ज्येष्ठ विचारवंत एस. एम. जोशी यांना ते गुरुस्थानी मानत. त्यांच्या निवासस्थानासह विविध संस्थांमध्ये एस. एम. जोशी यांचे तैलचित्र लावण्यात आलेले आहेत. 'हे माझे गुरु आहेत' असे सा. रे. पाटील सर्वांना सांगायचे. योगायोग म्हणजे एस. एम. जोशी यांचे १ एप्रिल १९८९ राजी निधन झाले होते. पाटील यांचेही १ एप्रिललाच निधन झाल्याने गुरूच्या स्मृतिदिनीच शिष्याचे निधन झाल्याची चर्चा उपस्थितात सुरू होती.

इच्छापूर्ती
सा. रे. पाटील हे कट्टर समाजवादी विचार सरणीचे होते. स्वत:च्या मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचा विधी केला जावू नये, अशी त्यांची इच्छा होती. तसेच त्यांनी स्वत:चा देह दान करण्याचा संकल्प केला होता. त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणताही विधी न करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला.
सा. रे. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच तालुक्यातील व्यापाऱ्यानी आपली दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली.


सा. रे. यांचे पार्थिव मिरज वैद्यकीय महाविद्यालयास दान
मिरज : माजी आमदार सा. रे. पाटील यांचा मृतदेह मिरज वैद्यकीय महाविद्यालयास दान देण्यात आला. शरीररचनाशास्त्र विभागाकडे वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्याचा वापर होणार आहे. बुधवारी दुपारी वैद्यकीय महाविद्यालयात सा. रे. पाटील यांचे पार्थिव आणल्यानंतर अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
मिरज वैद्यकीय महाविद्यालयात देहदानाची सोय आहे. सा. रे. पाटील यांनी मृत्यूपूर्वी देहदानाचा अर्ज भरला होता. बुधवारी दुपारी बेळगावातून सा. रे. पाटील यांचे पार्थिव मिरजेत आणण्यात आले. तेथून शिरोळ येथे ते अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता प्रमुख कार्यकर्ते व नातेवाइकांनी पार्थिव राष्ट्र सेवा दलाच्या ध्वजात गुंडाळून देहदानासाठी मिरजेत आणले. वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागात त्यांचा मृतदेह स्वीकारण्यात आला. अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर, प्रा. डॉ. एस. के. जाधव, माजी आमदार हाफिज धत्तुरे, रवींद्र फडके, सदाशिव मगदूम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. जाधव यांनी उपस्थितांना देहदानाची माहिती दिली.
सा. रे. पाटील यांच्या देहदानामुळे या चळवळीस प्रोत्साहन मिळून चांगले वैद्यक तज्ज्ञ तयार होणार असल्याचे डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले.
अंत्यदर्शनासाठी शिरोळ परिसरातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी गर्दी केल्यामुळे सुमारे एक तास पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. शरीररचनाशास्त्र विभागात फॉर्मालिन हे रसायन भरून मृतदेह
टिकविण्यात येतो. मृतदेह चार महिने फॉर्मालिन या रसायनाच्या हौदात बुडवून ठेवण्यात येणार आहे.
मृतदेह रसायनात बुडविण्यात आल्यानंतर उशिरा आलेल्या
आमदार उल्हास पाटील यांच्यासह अनेकांना अंत्यदर्शन घेता आले
नाही.

Web Title: Bit Ray Patil dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.