Maharashtra Political Crisis: “महापौर बंगल्यात वडिलांच्या स्मारकासाठी ते ५०० कोटी स्वतःच्या खिशातून खर्च करा ना उद्धवजी”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 12:25 PM2022-07-27T12:25:42+5:302022-07-27T12:26:41+5:30
Maharashtra Political Crisis: कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही उद्धवजी, अशी बोचरी टीका करण्यात आली आहे.
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठेच भगदाड पडले आहे. पक्ष वाचवण्याचे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर असल्याचे सांगितले जात आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही आता कंबर कसली आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.
भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. लागोपाठ केलेल्या ट्विटमधून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. आपण हासे लोकाला विश्वासघात आपल्या कपाळाला... किती ते वैफल्य, किती तो जळफळाट... कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही उद्धवजी, अशी बोचरी टीका करण्यात आली आहे.
ते ५०० कोटी स्वतःच्या खिशातून खर्च करा ना उद्धवजी
या मुलाखतीदरम्यान, माझ्या वडिलांचे नाव वापरू नका, असे उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना ठणकावून सांगितले. यावरूनही अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचेच एक वाक्य घेऊन पुढे, पण त्यांचे स्मारक महापौर बंगल्यात, सरकारी म्हणजे जनतेच्या पैशाने करा... ते ५०० कोटी स्वतःच्या खिशातून खर्च करा ना उद्धव जी..., असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यावरून मर्मावर बोट ठेवले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भाजप असे का वागले हे मलाही समजले नाही, पण ठीक आहे. तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. त्यांच्या पक्षातले जुनेजाणते निष्ठावान, त्यावेळी आमच्या बरोबर युतीत असणारे अनेक नेते आजही माझ्या संपर्कात आहेत. पण ते निष्ठेने भाजपसोबत आहेत. त्यांच्याबद्दल मला असा गैरसमज करू नाही द्यायचा की, त्यांना शिवसेनेसोबत यायचे आहे. मी उगाच असा पोकळ दावा करणारही नाही. मात्र त्यांना सध्याच्या गोष्टी पटत नाहीत. पण तरीदेखील ते निष्ठेने भाजपचे काम करताहेत. बाहेरच्या माणसांना सर्व दिलं जातंय. त्यांच्या डोक्यावरती बाहेरची माणसे बसवली. त्यावेळी वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून बाहेरचा माणूस. आता मुख्यमंत्रीपदी… इतर पदांवरही बाहेरचे. तरीही ते निष्ठा म्हणून काम करीत आहेत, अशी टोलेबाजी उद्धव ठाकरेंनी केली.