मुंबई - केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला विविध कारणांमुळे टीकेचे लक्ष्य व्हावे लागत आहेत. काही प्रकरणांमध्ये तर स्वपक्षीय नेत्यांच्याच बेतालपणामुळे पक्षाच्या अडचणी वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने राज्यातील आपल्या तीन प्रमुख प्रवक्त्यांच्या बोलण्यावर बंदी घातली आहे. दहीहंडीदरम्यान, मुलींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार राम कदम, बलात्काराचा आरोप झालेले ज्येष्ठ नेते मधू चव्हाण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार असल्याचा साक्षात्कार झालेले अवघूत वाघ यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर जाऊन बोलण्यास पक्षाकडून मनाई करण्यात आली आहे.दहीहंडी उत्सवादरम्यान, भाजपाचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी तुम्हाला आवडलेली मुलगी पळवून आणण्यास मी मदत करेन, असे वक्तव्य केले होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात वादळ उठले होते. तसेच भाजपावर नामुष्की ओढवली होती. त्यामुळे राम कदम यांना प्रसारमाध्यमांसमोर बोलण्यास पक्षाकडून मनाई करण्यात आली आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले मधू चव्हाण हे महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांनाही प्रसारमाध्यमामध्ये जाऊन पक्षाची भूमिका मांडू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचा 11वा अवतार असल्याचा दावा करून भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी वादाला तोंड फोडले होते. त्यामुळे त्यांनाही सध्या प्रसारसमाध्यमांसमोर काही बोलू नका, असे बजावण्यात आले आहे.
म्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 6:54 PM