Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-भाजप युतीचे नवे सरकार आले. यानंतर महाविकास आघाडीकडून सातत्याने नव्या सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली जात आहे. याला शिंदे गट आणि भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निशाणा साधण्यात आला. यावर भाजपने पलटवार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जरी जात असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय त्यांना दिल्लीत अपॉइमेंट मिळणे कठीण आहे, असा टोला लगावला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांना यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. दर १५ दिवसांनी किंवा महिन्याभराने मुख्यमंत्री शिंदेंना दिल्लीला गेले पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि केंद्राची मदत लागेल
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत प्रचंड वजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी बैठका घेतलेल्या आहेत. मोदींनी जे जे प्रकल्प आणि योजना एकनाथ शिंदे मागतील आम्ही त्या देऊ असे सांगितले आहे. यासंदर्भातील माहिती शिंदे आणि फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला किंवा १५ दिवसाला माननीय मुख्यमंत्री दिल्लीला गेले पाहिजे. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि केंद्राची मदत लागेल. केंद्राच्या मदतीशिवाय कुठलंही राज्य पुढे जाऊ शकत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितले.
अडीच वर्ष महाराष्ट्राची यांनी खराब केली
महाविकास आघाडीवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, केंद्राची मदत यांनी घेतली नाही. अडीच वर्ष महाराष्ट्राची यांनी खराब केली. अडीच वर्ष महाराष्ट्र विकासापासून यांनी वंचित ठेवला. केंद्र जोपर्यंत पूर्ण मदत करत नाही तोपर्यंत राज्य पुढे जाऊ शकत नाही. एकनाथ शिंदे हे विकासकामे करणारे मुख्यमंत्री आहेत. विकास मागणारा व्यक्ती जर मुख्यमंत्री पंतप्रधानांना, केंद्रीय नेतृत्वाला भेटत असेल तर यांना कुठे तोंड फुटलेय? अडीच वर्षात यांनी काय केले? मोदींनी त्यांना थांबवले होते का, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे.
दरम्यान, मी तर असे म्हणेन आम्हाला आनंद आहे की शिंदे आणि फडणवीस मोदींना भेटून महाराष्ट्राच्या विकासाची योजना तयार करत आहेत. मला वाटतं त्यांनी आता जरा शांत बसले पाहिजे. शिंदे आणि फडणवीस यांच्या विकासाच्या बुलेट ट्रेनचा आराखडा बघितला पाहिजे, असे आवाहन केले आहे.