Vidhan Parishad Election: "राज्यसभेच्या निकालात 'मविआ'चा पत्त्यांचा बंगला हलला, आता तो २० तारखेला कोसळेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 09:23 PM2022-06-18T21:23:49+5:302022-06-18T21:24:10+5:30
विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडून प्रविण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे.
मुंबई - महाविकास आघाडीत जो असंतोष आहे त्याला वाट मिळाली पाहिजे म्हणून भाजपानं पाचवा उमेदवार उभा केला. हा असंतोष आमच्या पाचव्या उमेदवाराला विजयी करेल. निवडणूक सोप्पी नाही परंतु संभव आहे असंभव नाही. चमत्कारावर विश्वास ठेवत नाही. आम्ही पाचवा उमेदवार उभा केला आहे. आमच्याकडेही असंतोषाबाबत माहिती आहे. त्यामुळेच आमचा पाचवा उमेदवार जिंकू शकतो असा विश्वास भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, कुठलाही पक्ष आपला उमेदवार जिंकावा यासाठी प्रयत्न करते. राजकारणात कुणीही दुसऱ्याचा उमेदवार जिंकवण्यासाठी स्वत:च्या पक्षाचा उमेदवार धोक्यात टाकू शकत नाही. भाजपाने पाचवा उमेदवार उभा केला आहे तर गणिताच्या आधारे केला आहे हे महाविकास आघाडीला माहिती आहे. त्यामुळे कुणाला याचा फटका बसणार याच्या नादात ते एकमेकांचे आमदार फोडत आहेत. नाना पटोले गंमतीदार बोलतात. ते ऐकायचं आणि सोडून द्यायचं. असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना फडणवीसांनी सांगितले की, १० तारखेला राज्यसभेच्या निकालात महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला हलला आहे. परंतु आता भाजपाचा पाचवा उमेदवार निवडून आल्यानंतर विधान परिषद निकालानंतर तो कोसळेल. तुम्ही सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. आपली रणनीती यशस्वी होईल असा दावा आमदारांशी बोलताना केला आहे.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडून प्रविण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादीने रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे आणि शिवसेनेने सचिन आहिर, आमश्या पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. नुकत्याच राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसला आहे. त्यामुळे विधान परिषदेतही त्याची पुनरावृत्ती होईल का? याकडेही सर्वांचे लक्ष लागलं आहे.