मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना भाजप आणि शिवसेना यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेसंदर्भात मोठे भाष्य केले आहे. शिंदे म्हणाले, “मी प्रत्यक्ष अमित शाहंची भेट घेतली तेव्हा त्यांना विचारले. त्यांनी मला सांगितले, की जर आम्ही बिहारमध्ये नितीश कुमार यांचे आमदार कमी असताना त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो आणि तुमचे ५० असताना आम्ही तुम्हालाही मुख्यमंत्री बनवू शकतो. तर मग, जर आम्ही शब्द दिला असता, तर तो का फिरवला असता?” शिंदे यांच्या या भाष्यानंतर, आता देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवी यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. भाजपने अडीच वर्षांचा फॉर्म्युला कधीच सांगितला नव्हता, असे शिंदे यांनी म्हटले आहे, असे विचारले असता, फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्री काय म्हणाले हे मला माहित नाही. मात्र, त्यांच्या म्हणण्यात पूर्ण तथ्य आहे. अडीच वर्षांचा फॉर्म्युला कधीच ठरला नव्हता. हे मी पहिल्या दिवसापासूनच सांगत आहे. कारण मी स्वतः साक्षिदार आहे. एवढेच नाही, तर सर्व वाटाघाटी मी स्वतः केल्या होत्या. यामुळे कधीही अडीच वर्षांचा फॉर्म्युला नव्हता."
याच वेळी, "आता त्यांना जे करायचे होते, ते झाले आहे. मला तर कधी-कधी अक्षरशः आश्चर्यवाटते, जेव्हा ते बेईमानी वैगेरे म्हणतात, सर्वात मोठी बैईमानी तर आमच्यासोबत झाली. आमच्यासोबत जे निवडून आले, ते जर आम्हाला सोडून विरोधकांसोबत सरकार स्थापन करत आहेत, तर याहून अधिक मोठा विश्वासघात काय असू शकतो?" असा सवालही यावेळी फडणवीस यांनी केला.