मधुकर ठाकूर
उरण - देशात अनेक राज्यात भाजपला आता मित्रपक्ष उरलेले नाहीत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत भाजपचा इजा,बिजा आणि पराभवाचा तिजा होणार असल्याची जोरदार टीका माजी मंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी उरण येथील जाहीर कार्यक्रमातून केली.
उरण विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने शनिवारी (४) शिवगर्जना अभियान व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.जेएनपीटी कामगार वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेना नेते सुभाष देसाई कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. निवडणूका जिंकण्यासाठी भाजपने महाराष्ट्रातील अनेक उद्योग राज्यातून गुजरातमध्ये नेऊन राज्याचे नुकसान केले आहे. पक्षाचे नाव, चिन्हही घेतलेत. मात्र निष्ठावंत प्रामाणिक शिवसैनिकांकडे जोपर्यंत मातोश्री आणि ठाकरे आहेत. तो पर्यंत कुठलीही शक्ती शिवसेनेला नमवू शकत नाही. राहीले ते निष्ठावान मावळे,उडाले ते कावळे अशी खरमरीत टीकाही भाजप आणि शिंदे गटावर शनिवारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केली.
राज्यात नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकीत भाजपला जनतेने चांगलाच धडा शिकवला असल्याचेही देसाई यांनी सांगितले.यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील यांनी पुढील जिल्हा परिषदेच्या निवडणूका शिवसेनाच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.तर जिल्ह्यातील शिवसैनिक निष्ठावान आहेत.त्यामुळे रायगडमधील तिन्ही गद्दार आमदारांना शिवसैनिक व जनता येत्या निवडणूकीत त्यांना त्यांची जागा दाखवुन देतील असा विश्वास व्यक्त करतानाच यासाठीच विजयाची शिवगर्जना गावोगावी झाली पाहिजे असे आवाहन जिल्हा प्रमुख व माजी मनोहर भोईर यांनी शिवगर्जना अभियान व कार्यकर्ता मेळाव्यात केले. या शिवगर्जना अभियाना अंतर्गत उरण शहरातून मोटार सायकल रॅलीही काढण्यात आलीं होती.
याप्रसंगी जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर,युवा नेते दीपक भोईर,पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर व इतर पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.