मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) अधिकारी पोहोचले आहेत. त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचं पथक दाखल झालं आहे. त्यांच्या कार्यालयांमध्येही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. सध्या प्रताप सरनाईक परदेशात आहेत. त्यांनीदेखील या माहितीला दुजोरीला दिला आहे. पण ईडी कोणत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोहोचली आहे, याचा तपशील आपल्याकडे नसल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रताप सरनाईक यांच्या घरी, कार्यालयात ईडीचे अधिकारी पोहोचल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 'मनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहेत. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे मला याबद्दल कोणतंही आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेत माफिया राज असल्याचा आरोप मी आधीही केला आहे. पालिकेतून कंत्राट, भागिदारीतून प्रचंड पैसा येत असतो,' याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
या प्रकरणी अद्याप शिवसेनेकडून कोणत्याही नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शिवसेना नेते थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याचं समजतं. मात्र ही कारवाई राजकीय स्वरूपची असून ती सूडबुद्धीनं सुरू असल्याचा सूर पक्षात आहे. अर्णब गोस्वामी, कंगना राणौत प्रकरणात सरनाईक यांनी अतिशय आक्रमकपणे पक्षाची बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याची चर्चा शिवसेनेत आहे.