ठाणे: 'माझ्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांची झोप उडाली आहे. ते आता भाई लोकांची मदत घेत आहेत', असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी आज ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांप्रकरणी त्यांच्याकडून 21 कोटी रुपये वसूल करावे, अशी मागणी केली.
मला धमक्या येत आहेत...आयुक्ताशीं भेटण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली. 'सरकारला जागेवर आणण्याचे काम मी करत आहे, त्यामुळे अनेक मंत्र्यांची झोप उडाली आहे. यामुळेच काही मंत्री भाई लोकांची मदत घेत आहे. वाशीममध्ये माझ्यावर जो हल्ला झाला त्यात भावना गवळींचे काही भाई लोक होते. मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतो म्हणून उद्धव ठाकरेंचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत', असा गंभीर आरोह त्यांनी केला. तसेच, कितीही गुंडांना बोलावले आणि दाऊदला आणले तरी आम्ही घाबरणारे नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
परब आणि सरनाईकांचे बांधकाम तुटणारआज सोमय्या यांनी ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेऊन प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांबाबत पालिकेने त्यांच्याकडून 21 कोटी रुपयांचा दंड वसूल करावा अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 'मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडला, आता अनिल परब यांचे ऑफिस तुटणार आणि प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामवर कारवाई होणार', यासाठी मी ठाणे महापालिका आयुक्त यांना भेटायला आलो आहे, असं त्यांनी सांगितलं.
सोमय्यांना Z सुरक्षाकाही दिवसांपूर्वी सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यात सोमय्या यांनी इजा झाली नाही. त्या घटनेनंतर, मोदी सरकारने त्यांना 40 CISF जवानांची Z दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. सोमय्यांना येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे.