पालघर – राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. त्यामुळे भाजपाला नव्या मित्राची गरज आहे. यातच भाजपा-मनसे युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्यामुळे या चर्चेला आणखीच वाव मिळाला.
आता आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकीत युती आणि आघाडीच्या चर्चा सुरु झाल्यात. महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा अशी लढत यात पाहायला मिळेल. परंतु ज्याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे ते म्हणजे भाजपा-मनसे युती होणार का? याची सुरुवात पालघर जिल्ह्यापासून सुरु झाली आहे. पालघरमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपा-मनसे एकत्रित आल्याचं दिसून आलं आहे. भाजपाचे पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे. हे वृत्त टीव्ही ९ ने दिलं आहे. त्यामुळे पालघरची पुनरावृत्ती राज्यात इतर ठिकाणी होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे .
“राजसाहेब, भाजपशी युती करा, फायदा होईल” पुण्यातही चर्चा
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरू असून, यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता राज ठाकरे(Raj Thackeray) काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून अशा चर्चा माध्यमात आहेत. पण अशा चर्चांना काहीही अर्थ नसतो. भाजपसोबत युती होणार की नाही याचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरेच घेतील, असे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश सातपुते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
मनसे- भाजपा छुप्या युती?
भाजपा नव्या मित्राच्या शोधात आहे मग शिवसेनेला टक्कर देणारा तितक्याच ताकदीचा चेहरा कोण असेल तर मनसे हा भाजपासाठी पर्याय ठरू शकतो. मनसे आणि भाजप यांच्या युतीच्या चर्चा अलीकडे कधी सुरु झाल्या? तर जेव्हा चंद्रकांत पाटील हे राज ठाकरे यांना नाशिकमध्ये भर रस्त्यात भेटले. त्यानंतर चंद्रकांत पाटील थेट राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचले. तेव्हापासूनच सगळ्यांच्या नजरा या युतीच्या घोषणेकडे लागलेल्या आहेत. एक चर्चा अशी आहे, की मनसे आणि भाजप(MNS-BJP) हे छुप्या पद्धतीने युती करू शकतील म्हणजे प्रत्यक्षात निवडणुकीपूर्वी हातमिळवणी होणार नाही पण ते शिवसेनेविरोधात आपली ताकद लावतील. पण स्थानिक पातळीवर पालघरमध्ये ही युती झाल्याचं दिसून येते.