द्रौपदी मुर्मू यांच्यापूर्वी राष्ट्रपतीपदासाठी भाजपाने मला ऑफर दिली होती, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 08:29 AM2024-02-14T08:29:19+5:302024-02-14T08:30:35+5:30
Prakash Ambedkar News: द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यापूर्वी भाजपाने राष्ट्रपतीपदासाठी मला ऑफर दिली होती, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यापूर्वी भाजपाने राष्ट्रपतीपदासाठी मला ऑफर दिली होती, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मात्र ही ऑफर भाजपाच्या कुठल्या नेत्याने दिली होती, याचा उलगडा मात्र प्रकाश आंबेडकर यांनी केलेला नाही.
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी हा सनसनाटी दावा केला. ते म्हणाले की, द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यापूर्वी भाजपाने तुम्हाला राष्ट्रपती बनायला आवडेल का? अशी विचारणा माझ्याकडे केली होती. तेव्हा माझ्या राजकीय जीवनातील १० वर्षे शिल्लक असून, तुम्ही मला आताच राजकारणातून काढण्याचा प्रयत्न करत आहात का? असा सवाल मी त्यांना विचारला. जर २०२४ मध्ये राजकीय पक्षांनी व्यवस्थित काम केलं तर मी तुमच्या विरोधात आहे, याची कल्पना तुम्हला आहे. म्हणूनच तुम्ही मला सध्याच्या राजकीय चित्रामधून काढण्याचा प्रयत्न करत आहात, असे मी त्यांना सांगितले.
यावेळी राष्ट्रपती पदासाठी भाजपाच्या कुठल्या नेत्याने ऑफर दिली, अशी विचारणा केली असता त्याचं उत्तर देणं प्रकाश आंबेडकर यांनी टाळलं. मला देण्यात आलेल्या या ऑफरबाबत भाजपाच्या नेत्यांना विचारा, ते तुम्हाला माहिती देतील. मात्र मला ही ऑफर कुणी दिली होती, त्याचा सोर्स कधीही सांगणार नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ज्या रस्त्याने जायचं नाही, त्या रस्त्याचा आम्ही कधीही विचार केला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने आमच्याविरोधात कितीही भूमिका घेतली. तरी आम्ही भाजपासोबत कधीही हातमिळवणी केलेली नाही. आज संघ आणि भाजपाच्या विचारसरणीला जर कुणी आव्हान देऊ शकत असतील, तर ते फुले, शाहू आंबेडकरांचे विचार आहेत. त्यामुळे मला राष्ट्रपतीपद, पंतप्रधानपद आणि राज्यपालपद यापैकी काहीही ऑफर दिली तरी मी अजिबात भाजपात जाणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.