अतुल कुलकर्णी ।मुंबई : आपण सत्तेत असलो तरी भाजपा हाच आपला नंबर एकचा शत्रू आहे. भाजपाकडून जेथे कुठे चुकीचे घडत असेल तेथे रस्त्यावर उतरा, असा आदेशच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यभरातून आलेल्या पक्षाच्या पदाधिका-यांना दिला. जबाबदारी टाळली तर नव्या लोकांना संधी मिळेल, असा दमही भरला.शिवसेनेचे मंत्री, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख यांची बैठक शिवसेना भवनात झाली. या वेळी अनेक पदाधिकाºयांनी सेनेच्या मंत्र्यांच्या वागणुकीवर आक्षेप घेतले. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना आॅटोरिक्षा संघटनेच्या कार्यक्रमात एका पदाधिकाºयाने सुनावले होते. तो धागा पकडून ठाकरे म्हणाले, मी पक्षात बेदिली माजू देणार नाही. कधी काय करायचे ते मला कळते. पक्षाच्या पुढील वाटचालीवर बोलताना ठाकरे म्हणाले, (पान ५ वर)(पान १ वरून) येणाºया विधानसभा निवडणुकीसाठी १४५ जागांचे आणि लोकसभेसाठी ३० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. ते पूर्ण करायचेच आहे, ही शेवटीची संधी समजून कामाला लागा असेही ठाकरे म्हणाले. शिवसेनेने सुरु केलेली गटप्रमुखांची कल्पनेची भाजपाने चोरी केली व त्याला बूथ प्रमुख नाव देत ती अंमलात आणली. आपण हातावर हात ठेवून बसायचे का? असा सवालही ठाकरे यांनी केला.भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशात ३५० जागांचे लक्ष्य ठेवल्याचा मुद्दा खा. संजय राऊत यांनी उपस्थित केला. ठाकरेंना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही छोटे छोटे विषय आमच्यावर सोपवा. आम्ही वाट्टेल ते करु पण तुम्हाला मुख्यमंत्री करु. भाजपाने उत्तरप्रदेशात विजयानंतर जल्लोष केला नाही, उलट लगेचच ते दुसºया राज्याच्या निवडणूक तयारीला लागले. त्यांचे हे वागणे आम्ही लक्षात घेणार की नाही, असा सवालही राऊत यांनी केला. राज्यमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाप्रमुखांवर बरसले. आपले जिल्हाप्रमुख काय करतात? त्यांच्यात व कार्यकर्त्यांमध्ये कसलाही समन्वय नाही, पक्ष वाढीची कामे ते करत नाहीत, असा सूर त्यांनी लावला. तीच री ओढत पर्यावरण मंत्री रामदास कदमही जिल्हाप्रमुखांवर घसरले. जिल्हाप्रमुखांना स्वत:साठी तिकिटे पाहिजेत, नंतर स्वत:च्या मुलांना, बायकोलाही तिकीट हवे असते. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एकाही जिल्हा प्रमुखाने शेतकºयांच्या कर्जमाफीचे साधे पाच हजार अर्ज देखील भरुन घेतले नाहीत, असे खडसावले. मात्र आमचेच मंत्री आमची कामं करत नाहीत, मग आम्ही कोणाकडे जायचे? असा पलटवार जिल्हाध्यक्षांनी केला. नंतर काही जिल्हाप्रमुखांनी रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते स्वत:च्या मुलासाठी काय करतात? याच्या सुरस कथा एकमेकांना ऐकवल्या.>बैठक लाइव्ह होताच ठाकरे चिडले!एका जिल्हाप्रमुखाने बैठकीचे लाइव्ह शूटिंग मोबाइलवरून कोणाला तरी पाठवले. तेथून ते काही न्यूज चॅनेलवर गेले. गुलाबराव पाटील, रामदास कदम आणि खा. संजय राऊत जिल्हाप्रमुखांवरून जे काही बोलत होते त्याची माहिती बाहेर गेल्याचे तेथेच बसलेल्या आदित्य ठाकरे यांना कळाली. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ते लक्षात आणून देताच ठाकरे भडकले. तुम्ही पक्षाचे प्रतिनिधी म्हणून बसला आहात की मीडियाचे? बंद करा मोबाइल... त्यावर पटापट सगळ्यांचे मोबाइल बंद झाले. बैठकीनंतर उद्धव यांनी मंत्री व काही प्रमुख नेत्यांची वेगळी बैठक त्यांच्या केबिनमध्ये घेतली.>कर्जमुक्ती कोणाला? यादी द्याकर्जमुक्तीची नुसतीच हवा आहे. कर्जमुक्ती झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी ४० लाख शेतकºयांचा सातबारा कोरा होईल आणि ८९ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ होईल, असे म्हटले होते. त्यांनी या सगळ्या शेतकºयांची यादी त्यांच्या नाव आणि पत्त्यासह विधानसभेत ठेवावी म्हणजे आमचा त्यांच्यावरचा विश्वास आणखी वाढेल, असे उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.
भाजपाच सेनेचा नंबर १ चा शत्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 6:37 AM