ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा-शिंदे गटाचा बोलबाला; पहिल्याच सामन्यात शतकी भागीदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 05:24 PM2022-08-05T17:24:52+5:302022-08-05T17:34:02+5:30
शिवसेनेतील बंडामुळे पक्षात उभी फूट पडल्याचं चित्र होते. त्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदात आमनेसामने आला.
मुंबई - राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. या २७१ पैकी तब्बल १०० हून अधिक ग्रामपंचायतींवर भाजपा आणि शिंदे गटाचा बोलबाला झाल्याचं दिसून येत आहे. २७१ पैकी भाजपानं ८२ तर शिंदे गटाने ४० हून अधिक ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला आहे. तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक फायदा झाला आहे. राज्यात ५३ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचं पॅनेल जिंकून आले आहे.
शिवसेनेतील बंडामुळे पक्षात उभी फूट पडल्याचं चित्र होते. त्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदात आमनेसामने आला. आज लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजपा ८२, राष्ट्रवादी ५३, शिंदे गट ४०, शिवसेना २७, काँग्रेस २२ तर इतरांना ४७ जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे गटाने मराठवाड्यात अभूतपूर्व यश मिळवलं आहे. धुळे जिल्ह्यात एकूण ५२ ग्रामपंचायतीत शिवसेनेला ३ प्लस, शिंदे गटाला २० प्लस, भाजपा १५ प्लस, काँग्रेस १० प्लस ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवता आला आहे.
औरंगाबादेत शिंदे गटाचे वर्चस्व पाहायला मिळालं. याठिकाणी शिंदे गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकालांकडे सगळ्यांचे लक्ष होते. शिंदे गटाने वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीत १२ जागा जिंकत शिवसेनेला धक्का दिला आहे. सिल्लोडमध्ये तिन्ही ग्रामपंचायतीवर शिंदे समर्थक गटाचा विजय झाला आहे. पैठण तालुक्यातील ७ पैकी ६ ग्रामपंचायती शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अनरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.
उद्धव ठाकरे गटाला मिळालं यश
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला बोलबाला पाहायला मिळाला आहे. चिंचपूरच्या या निकालामुळे भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांना मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूरात देशमुख यांचे वर्चस्व आहे. मात्र चिचंपूरमधील ग्रामपंचायतीच्या निकालाने उद्धव ठाकरे गटाने बाजी मारत भाजपाला चितपट केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचे निकाल लागणार आहेत. यात पहिला निकाल चिंचपूर ग्रामपंचायतीचा लागला असून शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आल्यानं कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे.