कागलमध्ये युतीसमोर 'घाटगे' विरोधात 'घाटगें'चा गुंता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 04:41 PM2019-07-28T16:41:04+5:302019-07-28T16:44:32+5:30
समरजित घाटगे या तरूण चेहऱ्याला आगामी विधानसभा निवडणुकीत उतरवण्याच्या हालचाली चंद्रकात पाटील यांच्याकडून होत असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक राहिले आहेत. त्याआधी सर्वच पक्षातील इच्छुकांनी पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघात युतीकडून उमदेवारी मिळवण्यासाठी 'घाटगे' विरोधात 'घाटगे' असे चित्र पहायला मिळत आहे. शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांनी निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले, असताना भाजपकडून शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे कागल मतदारसंघात 'घाटगे' विरोधात 'घाटगें'चा एक नवा गुंता युतीसमोर पुढे आला आहे.
युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. तर कागलमध्ये घाटगे- मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांची झालेल्या बैठकीत त्यांनी, शिवसेनेकडून निवडणूक लढवणारच अशी भूमिका सुद्धा स्पष्ट केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून, हा मतदारसंघ शिवसेनेकडून घ्यावा आणि समरजित घाटगे यांना युतीचे उमेदवार म्हणून घोषित करावे असा प्रयत्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्याकडून सुरु असल्याचे बोलले जात आहे.
तर, समरजित घाटगे यांनी सुद्धा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. दिवंगत आमदार विक्रमसिंह घाटगे यांच्या विकासाचा वारसा घेऊन गेले चार ते साडे चार वर्षे समरजित घाटगे कागलच्या जनतेपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी देतांना युतीसमोर घाटगे' विरोधात 'घाटगें'चा गुंता पुढे आला आहे. मात्र ही उमदेवारी शेवटी कुणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
कागल तालुका हे कोल्हापुरातील राजकारणातील उलाढालीचे आजवर प्रमुख केंद्र राहीले आहे. कागल मतदारसंघात राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे विद्यामान आमदार आहेत.मुश्रीफ यांची मतदारसंघात चांगली पकड आहे. त्यामुळे कागल तालुक्यात नवे नेतृत्व म्हणून जोरदार चर्चेत असलेले समरजित घाटगे या तरूण चेहऱ्याला आगामी विधानसभा निवडणुकीत उतरवण्याच्या हालचाली चंद्रकात पाटील यांच्याकडून होत असल्याचे बोलले जात आहे.