सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा केला आणि राज्यात बेईमानीने सत्ता मिळविली. पण आम्ही सावध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही किमान २०० जागा जिंकू. त्यामुळे NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न सोडून दिले पाहिजे असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
सातारा जिल्ह्याचा संघटनात्मक प्रवास करताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा करणारे भोंदूबाबा कोण आहे ते सर्व देशाला आणि महाराष्ट्राला माहिती आहे. एकदा कोणी शरद पवार यांच्या तावडीत सापडले की, सुटत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाचे सर्व काही स्वीकारले आहे. आता फक्त काँग्रेसचे संविधान त्यांनी स्वीकारायचे बाकी आहे. आपल्या पक्षाचे संविधान म्हणून काँग्रसेच्या संविधानाची नक्कल करून निवडणूक आयोगाला सादर करावी असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीजवळचे अतिक्रमण हटवावे म्हणून विश्व हिंदू परिषद, शिवप्रतापगड उत्सव समिती, हिंदू एकता आंदोलन अशा अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने केली. मतांच्या राजकारणासाठी आणि लांगुलचालनामुळे उद्धव ठाकरे सरकारला हे अतिक्रमण काढण्याची हिंमत झाली नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अतिक्रमण हटविले याबद्दल सरकारचे अभिनंदन करतो असंही बावनकुळे म्हणाले.
बावनकुळेंनी मेंदूचा आधी तपास करुन घ्यावा - राष्ट्रवादीजादूटोणा, भोंदूबाबा हे शब्द सभ्य संस्कृतीतील नाहीत. राजकारण करायचं असेल तर मुद्दयावर राजकारण करा असा इशारा देत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी बावनकुळे यांचा समाचार घेतला. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा कुठल्या सरकारने आणला याचा विसर बावनकुळे यांना पडला असावा. शरद पवार यांची पकड महाराष्ट्रावर आहे. तुमच्यासारख्या जातीयवादी पक्षाच्या तावडीतून शिवसेनेला मुक्त करुन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले ही किमया पवारांनी आहे. त्यामुळे २९ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल तेव्हा तुमचे सरकार पायउतार होणार हे निश्चित आहे. त्यानंतर तुम्हाला जादूटोणा जे काही करायचं ते करा असेही महेश तपासे यांनी बावनकुळे यांना सुनावले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"