मुंबई - अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपेलेल्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मात्र अजूनही युतीत जागावाटपाचा निर्णय होऊ शकला नाही. अकोल्यातील पाच पैकी चार ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तर जिल्ह्यातील एकही मतदारसंघात सेनेचा आमदार नाही. त्यात विद्यमान आमदार असलेल्या जागा बदलणार नसल्याचा खुलासा आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे सेनेला अकोल्यात एकपेक्षा अधिक जागा मिळवण्यासाठी, भाजपला जागावाटपात एक पाऊल मागे घ्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप वेगवेगेळे रिंगणात उतरले होते. अकोल्यातील पाच मतदारसंघापैकी चार ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले होते. तर शिवसेनेला एकही आमदार जिल्ह्यातून निवडून आणता आला नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत युती निश्चित समजली जात आहे. त्यामुळे पाच पैकी किमान दोन मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. मात्र विद्यमान जागा बदलणार नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे सेनेच्या वाटेला एक जागा सुटू शकते.
मात्र पाच पैकी दोन जागा मिळवण्यासाठी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच एक जागा शहरातील असावी अशी अट सुद्धा सेनेकडून घालण्यात आली आहे. या साठी जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते शिवसेनाप्रमुखउद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे युतीच्या जागावाटपात अकोल्याच्या बाबतीत भाजप एक पाउल मागे घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.