Sharad Pawar: सरकार पडेना म्हणून भाजप अस्वस्थ; शरद पवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 07:03 AM2022-03-10T07:03:33+5:302022-03-10T07:03:48+5:30
Sharad Pawar: केंद्रीय यंत्रणांच्या मदतीशिवाय ‘ते’ रेकॉर्डिंग मिळविणे अशक्य
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्राची सत्ता भाजपच्या हातातून गेल्यानंतर विविध केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नसल्यामुळे अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतली असावी, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बवर लगावला आहे.
फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत टाकलेल्या पेनड्राईव्ह बॉम्बबाबत पवार म्हणाले की, १२५ तासांची रेकॉर्डिंग मिळवणे ही कौतुकास्पद बाब आहे. शक्तिशाली केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीशिवाय हे शक्य नाही. मात्र, त्या रेकॉर्डिंगची सत्यता आधी तपासली गेली पाहिजे. त्याची चौकशी राज्य सरकार नक्की करेल. त्या रेकॉर्डिंगमध्ये प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या माझेही नाव घेतले गेल्याचे दिसते. मात्र, माझे यासंदर्भात कुणाशी बोलण्याचे काही कारण नाही. एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनामध्ये प्रतिनिधित्व करत असते, त्यावेळेस त्याच्यावरच्या तक्रारींची शहानिशा केल्याशिवाय भाष्य करणे योग्य नाही. विनाकारण तक्रार करून लोकप्रतिनिधींवर वेगवेगळ्या केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन त्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न सध्या होत आहे.
देशमुखांच्या घरावरील ९० छापे सत्तेचा गैरवापर
सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांद्वारे चौकशी करण्याचे सर्वात मोठे उदाहरण हे अनिल देशमुख यांचे आहे. एकाच व्यक्तीच्या घरावर ९० छापे टाकण्याचा प्रकार मी तरी पहिल्यांदा पाहिला, असे ते म्हणाले.
राजीनामा नाही
मलिकांनी राजीनामा द्यायचा संबंधच नाही. मुस्लिम नेता असला की त्याचा संबंध थेट दाऊदशी जोडला जावा, हे फार निरर्थक आहे. खा. संजय राऊत यांनीही केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेल्या गैरवापराचा विषय पंतप्रधानांपर्यंत पोहोचवलेला आहे. पंतप्रधानही खोलात चौकशी करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आराेपांबाबत ‘दूध का दूध होईल’; वळसे पाटील यांचा टोला
n देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे बुधवारी विधानसभेत उत्तर देणार होते. ‘माझ्याकडे सगळे उत्तर तयार आहे. पण, आज विरोधी पक्षनेते फडणवीस यांना बाहेर जायचे असल्याने उत्तर उद्या द्यावे, अशी विनंती त्यांनी मला केली होती.
n मी उद्या गुरुवारी उत्तर देईन, असे वळसे पाटील यांनी सांगितले. ‘फडणवीस यांच्या आरोपांवर ‘दूध का दूध, पानी का पानी होऊनच जाईल’, असे ते म्हणाले.