नागपूर - मी राजकीय वर्तुळात फिरत असतो, इतर पक्षातही मित्र आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर जे बाहेर आले ते मी ट्विट केले. ३ राज्याच्या निवडणुकानंतर भाजपा जोरात आहे. आपण एकट्याच्या ताकदीवरही निवडून येऊ शकतो असा विश्वास भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांना आला आहे. त्यात आपल्यावर जो फोडाफोडीचा आरोप आहे तो बाजूला ठेऊन स्वत:च्या ताकदीवर पुढे गेलो तर आपल्याला चांगले यश मिळेल असा त्यांचा विश्वास आहे. कमळावर लढण्यासाठी अनेकांना आग्रह धरणार, जर कमळावर लढले नाही आणि उद्या जर काही तडजोड करायची वेळ आल्यानंतर निवडून आल्यानंतर भूमिका बदलली तर, त्यामुळे २०१९ ला जे घडले त्याची पुनरावृत्ती भाजपा होऊ देणार नाही असं विधान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, कमळावर लढायचे असले तर लढा अन्यथा जाऊ द्या अशी भूमिका भाजपा घेईल. ज्यांच्या नावावर डाग आहे त्यांना बाजूला ठेवा अशी रणनीती आहे. भाजपाचा वैचारिक मतदार असलेले लोक आरोप असणाऱ्यांवर नाराज आहे. आरएसएस आणि भाजपा निवडणुका झाल्यानंतर पुढील ५ वर्षाच्या निवडणुकीची तयारी करत असतात. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले नाही. आम्ही निवडणूक झाल्यावर अभ्यास करतो. भाजपा नेत्यांकडूनच मला माहिती मिळाली. पुढे काही होईल हे माहिती नाही. कदाचित अजित पवार-एकनाथ शिंदे कमळावर निवडणूक लढतील असं त्यांनी म्हटलं.
तसेच काही खासदार आहेत ज्यांना कमळाची निशाणी हवी. त्यांना अन्य चिन्हावर लढायचे नाही.एकनाथ शिंदे हे शिवसैनिक व्हायच्या आधी RSS चे स्वयंसेवक होते. ही बातमी महाराष्ट्रासाठी धक्कादायक असेल पण हे खरे आहे. भाजपा एकट्याने लढावे असा आग्रह वैचारिक मतदार असलेल्यांची मते आहेत. अजित पवार-शिंदेसोबत कोण जाईल हे मला माहिती नाही असंही आव्हाडांनी स्पष्ट केले.