मुंबई : भाजपाची वर्षा निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक झाली. यानंतर अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात आली. यानंतर पुन्हा तासाभराने दुसरी बैठक घेण्यात आली. ही बैठक नुकतीच संपली असून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राजभवनाकडे रवाना झाले आहेत.
या बैठकीला राज्यातील नेत्यांसह भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव हेदेखील उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी दिल्लीवरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेण्याचे ठरले.
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा दूर करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले आहे. निवडणुकीचा निकाल लागून १५ दिवस उलटून गेले तरी, सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल मिळालेल्या भाजपचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांची सरकार स्थापनेची तयारी आणि क्षमता आहे का, हे जाणून घेण्यासाठी राज्यपालांनी त्यांना निमंत्रण पाठवले आहे. मात्र या पत्रात मुदतीचा उल्लेख नाही.
दुसरीकडे काँग्रेसने नवनिर्वाचित आमदारांना जयपूरला हलविले आहे. तेथे राज्यातील नेते कालच पोहोचले असून आमदारांशी चर्चा केली आहे. या बैठकीनंतर प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असल्याचे सांगितले. मात्र, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काँग3ेस राष्ट्रवादीला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल मिळाल्याचेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
शिवसेनेकडूनही बैठकांचे सत्रशिवसेनेने हॉटेल रीट्रीटमध्ये आमदारांची बैठक घेतली असून शह-काटशहाच्या राजकारणाला वेग आला आहे. भाजपाने 4 वाजेपर्यंत शिवसेनेला अल्टीमेटम दिला आहे. मात्र, त्यावर शिवसेना मानायला तयार नसल्याचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या पालखीचे भोई या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.