‘जैतापूर’ विरोध चिरडण्यासाठी भाजपचा डाव
By admin | Published: December 12, 2014 10:14 PM2014-12-12T22:14:34+5:302014-12-12T23:42:44+5:30
पालकमंत्रीपद घेणार : शिवसेनेला पुन्हा ‘दे धक्का’ची भाजपची तयारी सुरू
रत्नागिरी : जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा असलेला कडवा विरोध मोडून काढण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. त्यासाठीच रत्नागिरीचे पालकमंत्रिपद सेनेचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना न देता भाजपाचे मंत्री विनोद तावडे यांना देण्याचा हट्ट भाजपने धरला आहे. रामदास कदमांना अन्य जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्याची योजना विचाराधीन आहे. जिल्ह्याबाहेरील मंत्र्याला पालकमंत्री बनवण्याच्या भाजपाच्या या हालचालींमुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे. यावरून दोन्ही पक्षात रणकंदन माजण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जिल्ह्यातीलच मंत्र्याला मिळायला हवे, हा सर्वसामान्य संकेत आहे. जिल्ह्यात एकही मंत्री नसेल तरच बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्री पालकमंत्री म्हणून दिला जातो, हे सर्वसामान्य समीकरण आहे. राज्य मंत्रिमंडळात पर्यावरण मंत्री असलेले रामदास कदम रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे सुपुत्र आहेत, तर शिक्षणमंत्री तावडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याच्या कुणकवण गावचे आहेत. दोघांचेही कार्यक्षेत्र त्यांचे जिल्हे व मुंबईतील बोरिवली, कांदिवली हे भाग आहेत. त्यामुळेच रत्नागिरीचे पालकमंत्रिपद मूळ रत्नागिरीचे म्हणून कदमांना मिळायला हवे, हा संकेत आहे.
परंतु निवडणूकपूर्व युतीच्या मुद्द्यापासून ते आतापर्यंत भाजपाने सर्वच संकेत बाजुला ठेवून आपला वेगळा ‘बाणा’ दाखवला आहे. त्यामुळेच पालकमंत्रिपदाबाबत सेनेला अप्रिय ठरणारा निर्णय घेण्यास भाजप मागेपुढे पाहणार नाही, असेच सध्याचे राजकीय चित्र आहे.
जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा ठाम विरोध आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही ही भूमिका वारंवार मांडली आहे. कदम यांना पालकमंत्री केले; तर जिल्ह्याच्या प्रशासनावर त्यांचे नियंत्रण राहील व जैतापूरला असलेला सेनेचा विरोध अधिक कडवा होईल. प्रशासनालाही काम करणे अशक्य होईल, अशी भीती भाजपला वाटत आहे.
रामदास कदम रत्नागिरीचे पालकमंत्री झाले, तर जैतापूर प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सेनेच्या विरोधाचे अडथळे येणार, अशी भीती भाजपाला वाटते आहे. त्यामुळेच अद्याप जिल्ह्याला पालकमंत्री देण्यात आलेला नाही.
विनोद तावडे हे बोरिवलीतून निवडून आले असले तरी ते कोकणचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या प्रतिमेचा लाभ उठवित त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. जैतापूर विरोध चिरडण्यासाठी भाजपने पावले उचलली असल्याचे चित्र समोर येत असले तरी तावडे त्यांचा कोकणशी असलेला सततचा संपर्क व त्यांची जनमानसात असलेली प्रतिमा या साऱ्या गोष्टींचा लाभ पक्षाला मिळावा, यासाठीचे प्रयत्न या माध्यमातून सुरू असल्याचे सध्या तरी दिसत आहे. (प्रतिनिधी)
भाजपाची धूर्त खेळी ?
केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन केले होते. मोदी सरकारची तीच भूमिका आहे. दुसरीकडे शिवसेनेचा या प्रकल्पाला ठाम विरोध आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या मतदारसंघातून आमदार राजन साळवी हे जैतापूर विरोधाच्या मुद्द्यावरच सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.