शिवसेनेशी युतीसाठी भाजपाचा पुढाकार; ‘मातोश्री’वर जाऊन चर्चा करणार
By यदू जोशी | Published: March 27, 2018 06:01 AM2018-03-27T06:01:22+5:302018-03-27T06:24:01+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा करण्याची जबाबदारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
यदु जोशी
मुंबई : आगामी लोकसभा अािण विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती व्हावी, अशी भाजपाची इच्छा असून त्या दृष्टीने पुढाकार घेण्याचे पक्षाने ठरविले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा करण्याची जबाबदारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. सेनेच्या या निर्णयाचा भाजपाला फटका बसू
शकतो. तसेच तेलगु देसम पक्ष
एनडीएतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनाही आता राज्य सरकारमधून बाहेर पडणार
अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाचे मन वळविण्याचा भाजपाचा
प्रयत्न आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्याशी मुनगंटीवार यांनी चर्चा केली.
मुनगंटीवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, भाजपा-शिवसेना
युती झाली तर लोकसभा निवडणुकीत २०१४ प्रमाणेच प्रचंड यश आम्हाला
मिळेल. तसेच विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने आम्ही पुन्हा सत्तेत येऊ,
असा आमचा विश्वास आहे. त्यासाठी युती होणे आवश्यक असून उद्धव ठाकरेंना आपण लवकरच भेटणार आहोत.
सूत्रांनी सांगितले की, दोन पक्षांमध्ये ज्या मुद्यांमुळे मतभेद झालेले आहेत त्या मुद्यांवर चर्चा करून दरी कमी करण्याची शिष्टाई मुनगंटीवार करतील. त्यानंतरच जागा वाटपावर चर्चा होईल. भाजपाच्या पुढाकाराला शिवसेनकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे समजते. या हालचालींकडे राजकीय विश्लेषकांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील सत्तेत भाजपाचा
वरचष्मा आहे. महत्त्वाची खाती भाजपाकडे आहेत. त्यामुळे भाजपाच्या आमदारांना जादा निधी व योजना दिल्या जातात अशी शिवसेनेची नाराजी आहे. पक्षाच्या आमदारांनी ती उद्धव ठाकरेंकडे बोलूनही दाखविली आहे.
शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपाने ताकद वाढविणे सुरू केले आहे. शासनाच्या विविध समित्यांवर नियुक्ती करताना शिवसेनेला योग्य वाटा दिला जात नाही यावरूनही नाराजी आहे.