शिरपूर (जि.धुळे)- सावळदे येथील तापी नदी पात्रात मंगळवारी आत्महत्या करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भोद येथील दाम्पत्यासह मुलीचा मृतदेह बुधवारी सकाळी सापडला असून, त्यांचे मृतदेह शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत. भोद (ता.धरणगाव, जि.जळगाव) येथील राजेंद्र रायबन पाटील (५१) त्यांची पत्नी वंदना (४५) व मुलगी ज्ञानल (२१) हे १७ रोजी राजेंद्र पाटील यांच्या बहिणीच्या सासऱ्यांच्या दशक्रिया विधीसाठी अमळनेर तालुक्यातील हेडावे येथे कारने (एमएच १९-एपी१०९४) गेले होते. तेथून तिघेही अमळनेर तालुक्यातील नातेवाईकांकडे जात असल्याचे सांगत ते निघाले. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद होता. १७ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांची कार मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील सावळदे पुलावर आढळून आली. १७ रोजी रात्री आढळेल्या या कारकडे १८ रोजीही कोणीही फिरकले नाही. त्यामुळे उपस्थितांना शंका आल्याने त्यांनी थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गाडीचा तपास केला तेव्हा ती भोद येथील राजेंद्र पाटील यांची असल्याचे निष्पन्न झाले. घरात झालेल्या वादातून तिघांनी सावळदे पुलावरून तापीच्या पात्रात उडी घेत आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान बुधवारी सकाळी तापीनदीपात्रात शोध मोहीम राबविण्यात आली. त्यात सकाळी ७ वाजता राजेंद्र पाटील व मुलगी ज्ञानल पाटील यांचा तर दहा वाजता पत्नी वंदना पाटील यांचा मृतदेह सापडला. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्रालयात आणण्यात आले असून, पोलीस पंचनामा करीत आहे.
धुळे जिल्ह्यातील सावळदे येथील तापी नदीत आत्महत्या केलेल्या दाम्पत्यासह मुलीचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 12:43 PM