मोहोळने पटकाविला किताब
By Admin | Published: May 17, 2016 02:39 AM2016-05-17T02:39:47+5:302016-05-17T02:39:47+5:30
सांगवडे (मावळ) येथील भैरवनाथ उत्सवानिमित्त आयोजित निकाली कुस्त्यांच्या मैदानात नामवंत मल्लांच्या प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या
किवळे : सांगवडे (मावळ) येथील भैरवनाथ उत्सवानिमित्त आयोजित निकाली कुस्त्यांच्या मैदानात नामवंत मल्लांच्या प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या. मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रातील आशियाई पदकविजेता महेश मोहोळ व महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांच्यातील अंतिम लढत बरोबरीत सुटल्यांनतर पंच कमिटीच्या निर्णयानुसार महेश मोहोळ याला ‘मावळ मल्लसम्राट’ किताब व मानाची चांदीची गदा देण्यात आली. दोघांना प्रत्येकी रोख पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
सांगवडे ग्रामस्थ व कुस्ती संयोजन कमिटी आयोजित निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे पूजन किसन कदम व राष्ट्रवादीचे देहू अध्यक्ष प्रकाश हगवणे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी सरपंच सुनील राक्षे, महाराष्ट्र चॅम्पियन संभाजी राक्षे, भरत लिमन, किसन आमले, हनुमंत लिमन, आकाश पवार आदी उपस्थित होते. पुणे शहर, तसेच जिल्ह्यातील हवेली, मावळ व मुळशीतील विविध तालमींतील नामांकित मल्लांच्या उत्सवापूर्वी ठरविलेल्या निकाली कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. सर्वसाधारणपणे उत्सवातील मैदाने (आखाडे ) सायंकाळी बंद केले जातात. मात्र, संयोजकांनी पुरेशी प्रकाश व्यवस्था करून सायंकाळी पाच वाजता सुरु केलेल्या कुस्त्या रात्री दहापर्यंत सुरु ठेवल्या होत्या. सर्व ठरलेल्या कुस्त्या पूर्ण केल्याने मल्लांनी व कुस्तीशौकिनांनी समाधान व्यक्त केले. लढती पाहण्यासाठी जिल्ह्यातील कुस्तीशौकिनांनी गर्दी केली होती.
ग्रामस्थांच्या वतीने ‘जय मल्हार’फेम अभिनेता देवदत्त नागे, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, भारत केसरी विजय गावडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष भेगडे, शंकर कंधारे, रोहित पटेल, शंकर मांडेकर, अॅड. कृष्णा दाभोळे, तानाजी काळोखे, रमेश गायकवाड आदींचा सत्कार करण्यात आला.
मैदानात अभिनेता देवदत्त नागे यांच्या हस्ते मोहोळ-घोडके यांची मैदानातील शेवटची कुस्ती लावण्यात आली. त्या वेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषणा देण्यात आल्या. नागे यांनी मल्लांना शुभेच्छा दिल्या. मैदानात उपस्थित प्रेक्षकांना अत्यंत चुरशीची लढत पहावयास मिळाली. कुस्तीचा निकाल न लागल्याने पंचांनी कुस्ती बरोबरीत सोडविली.
मोहोळ व घोडके यांना संयोजकांच्या वतीने रोख ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन पुणे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. संभाजी लिमण, राहुल विधाटे यांनी चांदीची गदा व सोमनाथ राक्षे यांनी गौरवचिन्ह दिले. पंच म्हणून अमोल राक्षे, गणेश लिमन, नागेश राक्षे, संदीप लिमन यांनी काम पाहिले. बाबा लिमन यांनी कुस्त्यांचे निवेदन केले. तर तुषार जगताप, भरत लिमन यांनी सूत्रसंचालन केले. सुनील राक्षे, भरत लिमन, अमोल राक्षे , संदीप लिमन, हनुमंत लिमन, दशरथ राक्षे, कैलास मोकाशी, तुषार जगताप, सचिन पवार, संतोष राक्षे, संतोष लिमन, सागर राक्षे, सागर मोकाशी आदींनी मैदानासाठी परिश्रम घेतले. (वार्ताहर)