सत्तेसाठी सीमारेषा ओलांडल्या?
By admin | Published: September 10, 2016 01:29 AM2016-09-10T01:29:35+5:302016-09-10T01:29:35+5:30
फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे प्रारूप प्रभागरचना त्रिसदस्यीय समितीकडे मंजुरीसाठी पाठविली आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे प्रारूप प्रभागरचना त्रिसदस्यीय समितीकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. प्रारूप प्रभागरचनेत गावे, वाड्या-वस्त्या फोडण्यात आल्या आहेत. महापालिकेत सत्ता येण्यासाठी भारतीय जनता पक्षाने खेळी खेळल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा अर्थात प्रारूप प्रभागरचना होय. गुगल अर्थच्या नकाशावर प्रगणकाचे गट बसवून प्रारूप प्रभाग रचना कराव्यात अशी सूचना निवडणूक आयोगाने केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून आदेश मिळताच रचना करून याचा आराखडा जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिकेचे आयुक्त यांच्या समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या समितीकडून येत्या १२ सप्टेंबरला हा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाकडे प्रारूपचा प्रस्ताव सादर होण्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांनी प्रभागांची तोडफोड केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. २००२, २०१२ च्या महापालिका निवडणुकीत केलेली रचना आणि २०१७ च्या निवडणुकीसाठी असणारे प्रभाग यात बदल केले आहेत. गावे, वाड्या-वस्त्या फोडण्यात आल्या आहेत. गावातील मतांचे विभाजन करणे, विभाजन केलेला भाग नवनगराला जोडून प्रभाग तयार केले आहेत. नवनगरांचा भागात भाजपाचा पॉकीट वोटर आहे. गावठाणे आणि उपनगरांचे विभाजन करून प्रस्थापित राष्ट्रवादीला शह देण्यासाठी ही मतांची खेळी खेळली जात आहे, अशी चर्चा शहरात रंगली आहे.
चार सदस्यीय प्रभागांमुळे दोन जागा या महिलांसाठी राखून ठेवण्यात येणार आहेत. तसेच अनुसूचित जाती-जमातींमधील महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागा या अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव जागा असलेल्या प्रभागांमधून सोडतीने काढण्यात येतील. ज्या प्रभागात नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता दोन जागा राखीव असतील, त्या प्रभागातील एक जागा थेट नागरिकांच्या मागासप्रवगार्तील महिलांकरिता आहे. (प्रतिनिधी)
>आरक्षण : पन्नास टक्के जागा महिलांसाठी
२०१२ च्या निवडणुकीत मतदारसंख्या ११ लाख ५२ हजार ५८९ होती, तर मतदारयाद्यांचे शुद्धीकरण, दुबार नावे वगळणी यांमुळे १ जानेवारी २०१६ला मतदारसंख्या १० लाख ६८ हजार ३७१ इतकी खाली आली. निवडणुकीसाठी प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करण्याची आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पद्धत नगरविकास विभागाने निश्चित केली आहे. लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार जागांचे आरक्षण ठरणार असून, अनुसूचित जातींसाठी २०, अनुसूचित जमातींसाठी ३ तर इतर मागासवर्गीयांसाठी ३५ जागा असतील, असा अंदाज आहे. नगरसेवक संख्या १२८ कायम राहणार असून, प्रभागांची संख्या ३२ असणार आहे. ५० टक्के जागा महिलांसाठी आहेत.