लाचखोर पोलीस निरीक्षक अटकेत
By admin | Published: June 11, 2015 01:52 AM2015-06-11T01:52:50+5:302015-06-11T01:52:50+5:30
फसवणुकीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या एका पोलीस निरीक्षकास बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या
मुंबई : फसवणुकीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या एका पोलीस निरीक्षकास बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. प्रशांत सावंत असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, तो बोरीवली पोलीस ठाण्यात कार्यरत होता.
बोरीवलीतील एका पतपेढीमध्ये २०१३मध्ये गैरव्यवहार झाला होता. याबाबत बोरीवली पोलिसांनी चार ते पाच जणांवर कारवाई केली होती. याच पतपेढीमध्ये काम करणाऱ्या तक्रारदाराच्या पत्नीलादेखील यामध्ये आरोपी करण्याची धमकी सावंत यांनी दिली होती. त्यानुसार त्यांनी अटकपूर्व जामीनदेखील मिळवला होता. मात्र यामध्ये पुन्हा रिव्हिजन अर्ज दाखल न करण्यासाठी सावंत यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यानुसार बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. यामध्ये सावंतला २० हजारांची लाच घेताना अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. (प्रतिनिधी)