बुद्धी, श्रद्धा यांच्याही वरचे स्थान विवेकाचे!

By admin | Published: April 3, 2015 11:59 PM2015-04-03T23:59:25+5:302015-04-03T23:59:25+5:30

मराठी साहित्याचा विचार करताना वाङ्मयेतिहासाची बाजू दुर्लक्षित करता येण्यासारखी नाही. उपलब्ध पुराव्यानुसार मराठी वाङ्मयाची सुरुवात तेराव्या

Buddha, Shraddha's top position, Vivek! | बुद्धी, श्रद्धा यांच्याही वरचे स्थान विवेकाचे!

बुद्धी, श्रद्धा यांच्याही वरचे स्थान विवेकाचे!

Next

मराठी साहित्याचा विचार करताना वाङ्मयेतिहासाची बाजू दुर्लक्षित करता येण्यासारखी नाही. उपलब्ध पुराव्यानुसार मराठी वाङ्मयाची सुरुवात तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली असे म्हणता येईल. या सुरुवातीचे श्रेय महानुभाव आणि वारकरी या दोन धर्मपंथांना द्यावे लागते. महानुभाव पंथात ईश्वरी अवतार मानल्या गेलेल्या श्रीचक्रधरस्वामींचे ‘लीळाचरित्र’ म्हाइंभटांनी लिहिले. त्याला मराठीतील आद्य चरित्रग्रंथ म्हणता येते. त्यानंतर काही वर्षांनी वारकरी संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवरील ‘ज्ञानेश्वरी’ या नावाने प्रसिद्ध झालेले शास्त्रकाव्यात्मक भाष्य लिहिले- तो मराठीतील पहिला पद्यग्रंथ किंवा काव्य होय. पुढे या दोन्ही धर्मपंथांमध्ये विपुल साहित्यनिर्मिती झाली.
पहिली पाच शतके वारकरी संतांचे साहित्य मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह राहिले. दरम्यानच्या काळात इतरही संप्रदाय अस्तित्वात आले. त्यांच्या अनुयायांनी काही निर्मिती केली. तथापि, त्या निर्मितीत साहित्यमूल्ये कमी पडल्यामुळे किंवा ते संप्रदाय बहुजनांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी न झाल्याने वारकरी साहित्याला पर्याय देणारा दुसरा प्रवाह अस्तित्वात येऊ शकला नाही. समर्थ रामदासांचा रामदासी किंवा समर्थ संप्रदाय हा पर्याय होऊ शकला असता; परंतु एक तर समर्थांचे आवाहन मुळातच उच्चवर्णीयांपुरते मर्यादित राहिले व दुसरे असे, की समर्थांनंतर त्यांच्या संप्रदायात ना त्यांच्या तोलामोलाचा कोणी ग्रंथकार होऊन गेला ना दासबोधासारखा ग्रंथ.
रामदासांच्या (आणि अर्थातच तुकोबांच्याही) मागेपुढे मयुरेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित असे संस्कृतनिष्ठ मराठी लिहिणारे कवी होऊन गेले. या कवींना पंडित कवी म्हणण्याची प्रथा वाङ्मयेतिहासात रूढ झाली आहे; परंतु संस्कृतानुगामी मराठीत लिहिणे यापेक्षा त्यांच्यात दुसरे काही साम्य आढळत नाही. त्यामुळे ‘पंडित कवी’ हा शब्द कोणत्याही परंपरेचा वाचक अथवा सूचक नाही. या कवींचा परस्परांशी काही संबंध दिसत नाही.
मराठी साहित्यातील पंडिती प्रकारचे साहित्य ही फक्त ब्राह्मण पुरुष लेखकांची निर्मिती आहे. संस्कृत भाषेवर प्रभुत्व असल्याशिवाय या लेखकांची मराठी समजणे कठीणच. त्यामुळे त्यांचे वाचकसुद्धा तितकेच मर्यादित. शूद्र, अतिशूद्र व स्त्रिया यांनी तर त्यांच्या जवळपाससुद्धा फिरकू नये.
नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत पुणे हे शहर मराठ्यांची राजधानी म्हणून भरभराटीस आले. या भरभराटीचाच एक भाग म्हणजे लावण्या लिहिणाऱ्या कवींचा (ज्यांना नंतर चुकीच्या पद्धतीने शाहीर असे नाव दिले गेले. हे लावणीकार स्वतचा उल्लेख ‘कवी’, ‘कवीश्वर’ असाच करतात.) उदय. होनाजीचा चुलता सातप्पा गवळी हा आद्य लावणीकार म्हणावा लागतो. बाळा गवळी हा त्याचा पुतण्या. हा बाळा बहिरू रंगाऱ्याच्याबरोबर लावण्या रचून गायचा, म्हणून त्या लावण्यांत बाळा बहिरू असे जोडनाव शेवटी आढळते.
न्या. महादेव गोविंद रानडे यांनी १८७८ साली पहिले ग्रंथकार संमेलन का भरवले असावे याचा अंदाज या पार्श्वभूमीवर करता येतो. विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावे इतकी मराठी भाषेची पात्रता ग्रंथरचनेच्या अभावी नाही, या आक्षेपावर त्यांना मात करायची होती. निदान त्यामुळे तरी मराठी लेखक ग्रंथ लिहू लागतील!
एकोणिसाव्या व विसाव्या शतकांचा संधिकाल हा एका बाजूने स्वातंत्र्याच्या चळवळीचा म्हणजेच चिपळूणकर- टिळक यांच्या राष्ट्रवादाचा होता तसाच तो दुसऱ्या बाजूने रानडे-आगरकर यांच्या सामाजिक सुधारणांचाही होता. तसाच रानडे-आगरकरांच्या सुधारणांना कौटुंबिक आणि चिपळूणकर-टिळकांच्या राष्ट्रवादाला उच्चवर्णीय समजून बहुजनांचा स्वतंत्र सुभा उभारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्राह्मणेतरांचाही होता. याच काळात लोकमान्य टिळक आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचे नेतृत्व भारतीय पातळीवर जाऊन महाराष्ट्र हिंदुस्थानचे नेतृत्व करू लागला होता. इंग्रजी कवितेची आणि नाटकाची छाप मराठी साहित्यावर पडण्याचा हा काळ होता. वासुदेव बळवंत पटवर्धन यांच्यासारख्या इंग्रजी साहित्याच्या जाणकाराने मराठी संतसाहित्याचे स्वायत्त अंतरंग ओळखले याचे विशेष कौतुक करायला हवे. पटवर्धन नेहमीप्रमाणे ‘संतसाहित्य’ असा शब्दप्रयोग न करता काव्याचा (किंवा साहित्याचा) ‘भक्ती संप्रदाय’ (भक्ती स्कूल) असा शब्दप्रयोग करतात. पटवर्धनांचा रानडे-भांडरकरांच्या प्रार्थना समाजाशी जवळचा संबंध होता. रानड्यांची इतिहास मीमांसाही त्यांना मान्य असल्यामुळे बहुधा साहित्य व राजकीय इतिहास यांची सांगड घालताना त्यांनंी ‘इट वॉज वन आॅफ द ग्रेटेस्ट अचीव्हमेंट्स आॅफ द पीपल दॅट इट वेल्डेड द डिफरन्ट ग्रुप्स इनटु वन पीपल. द भक्ती पोएट्स दस नॉट ओन्ली मेड लिटरेचर बट आॅल्सो मेड द पीपल इनटु अ नेशन’ असे लिहिले.
दलित साहित्य हे विद्रोहाचे साहित्य मानले जाते. त्याचा विद्रोह परंपरेविरुद्ध होता हे खरे असले, तरी परंपरेच्या अंतर्गत तरतमभाव करण्याची वृत्ती विवेकी रसिक साहित्यिकांमध्ये निश्चितच आहे. नोबेल पुरस्काराची पात्रता असणारे महाकवी नामदेव ढसाळ असोत किंवा मराठी कथाविश्व हादरून सोडणारे बाबूराव बागुल असोत, त्यांची तुकोबांशी जवळीक प्रसिद्धच होती. बागुलांनी एका कवितेत तुकोबांची वीणा हा बंदुकीला पर्याय मानला आहे!
खऱ्या मराठी माणसाची मानसिकता, वैचारिकता प्रगट करणाऱ्या कादंबऱ्या आधुनिक काळात रघुनाथ वामन दिघे यांनी लिहिल्या. मराठी कादंबरीचा आधुनिकतेकडून उत्तराधुनिकतेकडील प्रवास भालचंद्र नेमाड्यांच्या कादंबऱ्यांत पाहायला मिळतो. नेमाड्यांनी महानुभाव आणि वारकरी या दोन्ही परंपरा पचवल्या आहेत म्हणून.
हिंदू, मुस्लिम, अस्पृश्य, आदिवासी अशा विविध सामाजिक-धार्मिक गटांचे अभिसरण संतांच्या व्यापक मानवतावादी दृष्टीने करून जोतिराव फुल्यांना अभिप्रेत असलेल्या एकमय लोकांचे म्हणजेच भारत या राष्ट्राचे प्रतिबिंब साहित्यात पाहू शकणारे दिघे हे एकमेव लेखक होत, आणि त्यांना ही जी दृष्टी लाभली ती त्यांनी स्वीकारलेल्या संतविचारांमुळे. ज्ञानदेव-तुकारामांच्या विचारांत असलेल्या तत्त्वांची कलात्मक हाताळणी करणारे दिघे हे मराठी कादंबरीचे मापदंडच होत. मराठी संस्कृतीची नस पकडून त्यांनी वारकरी शेतकऱ्याला नायक बनवले. या अर्थाने ते देशी आहेत. पण मुळात वारकरी विचारच वैश्विक असल्यामुळे वारकरीही आपोआप वैश्विक होतात. त्यांचे देशी असणे हे वसाहतवादविरोधातून निष्पन्न झालेले नाही, तसेच त्यांची वैश्विकता हे भाबडे स्वप्नरंजन नाही.
चिंता करायची नाही याचा अर्थ निश्चिंतपणे स्वस्थ बसून राहायचे असा मात्र कोणी घेऊ नये. येऊ घातलेल्या उद्याच्या आर्थिक-सामाजिक विश्वाच्या एका बाजूचे दर्शन नंदा खरे यांनी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीतून घडवले आहे- ते सर्वांनाच अंतर्मुख करणारे आहे. व्यक्तीच्या स्वतंत्रतेपासून, स्वायत्ततेपासून आणि प्रतिष्ठेपासून सुरू झालेली भांडवलशाही आता नेमक्या याच गोष्टींच्या मुळावर आलेली आहे. साम्यवादी राष्ट्रांमधील शासनसंस्था व्यक्तीची कशी गळचेपी करते याच्या अनेक सुरसकथा आपण ऐकलेल्या आहेतच. एक साम्यवादी व्यवस्था तिचा आर्थिक पायाच भुसभुशीत झाल्यामुळे कशी कोसळली व दुसरीने वेळीच शहाणे होऊन आपला आर्थिक पाया भांडवलशाही व्यवस्थेलाही लाजवील अशा प्रकारे कसा बळकट केला आहे हेही आपण पाहिले आहे. यावर उतारा म्हणून काही शक्ती धर्माचे हत्यार घेऊन पुढे सरसावल्या आहेत. एक शक्ती पुढे ढकलणारी तर दुसरी मागे खेचणारी, अशा पेचप्रसंगातून संपूर्ण मानवजातच चाललेली आहे, त्याला महाराष्ट्र किंवा मराठी साहित्य अपवाद असण्याचे कारण नाही. अशा परिस्थितीत आपण अर्थांध किंवा धर्मांध होऊन कोणाच्या तरी मागे फरफटत जायचे की आपला विवेक शाबूत ठेवून आपल्यातील मनुष्यत्वही जपायचे, हा खरा प्रश्न आहे. मनुष्य हा बुद्धिमान प्राणी असल्याचा डांगोरा ग्रीक काळापासून पिटण्यात येत आहे, आणि ते खरेही आहे. याच बुद्धीने विज्ञानाची निर्मिती करून असे अनेक मार्ग माणसाला दाखवले. पण काय हवे असले पाहिजे हे बुद्धी सांगत नाही. तेथे विवेक कामाला येतो. विज्ञान आणि धर्म या दोहोंवरही विवेकाचे नियंत्रण पाहिजे. म्हणजेच बुद्धी व श्रद्धा यांच्याही वरचे स्थान विवेकाचे आहे. महात्मा गांधी हा आधुनिक काळातील सर्वांत महान विवेकवादी नेता होता. ते ज्याला आपला आतला आवाज म्हणत असत तो खरे तर त्यांचा विवेक होता.
नामदेवांसारख्या संतांनीसुद्धा समाजाच्या याच विवेकाला आवाहन केले होते. संतांमधील या अंगभूत विवेकाचा उल्लेख करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात,
‘चंद्र तेथे चंद्रिका । शंभू तेथे अंबिका ।
संत तेथे विवेका । असणे जेवी ॥’
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आज पंजाबी आणि मराठी भाषक मिळून संत बाबा नामदेवांकडे हेच मागणे मागू या.

Web Title: Buddha, Shraddha's top position, Vivek!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.