Budget 2023 : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी भरीव तरतूद, महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना १६ हजार कोटींपेक्षा अधिक निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 07:35 AM2023-02-02T07:35:48+5:302023-02-02T07:36:56+5:30
Budget 2023: वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल. राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी यावर्षी १६ हजार कोटींपेक्षा अधिक निधींची तरतूद केली आहे,
नवी दिल्ली : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल. राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी यावर्षी १६ हजार कोटींपेक्षा अधिक निधींची तरतूद केली आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडल्यानंतर रेल्वेच्या संदर्भात असलेल्या तरतुदींची माहिती देताना दानवे म्हणाले, गेल्या आठ वर्षात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना मिळणाऱ्या निधीमध्ये १० पटीने वाढ झाली आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्राला रेल्वेच्या प्रकल्पांसाठी केवळ १६०० कोटी रुपये मिळत होते. गेल्या वर्षी ही रक्कम १६ हजार कोटींवर पोहोचली आहे. यावर्षीच्या अंदाजपत्रकात रेल्वेला २ लाख ४० हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीचा विनियोग कसा करायचा यासंदर्भात रेल्वे मंडळात चर्चा केल्यानंतर निश्चित आकडेवारी देण्यात येईल.
वर्धा-यवतमाळ-नांदेड महत्त्वाकांक्षी प्रकल्प
राज्यातील तीन रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. विदर्भ व मराठवाडा या भागांना जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात वर्धा-यवतमाळ-नांदेड, नगर-बीड-परळी व नागपूर-नागभीड या रेल्वे मार्गांचा समावेश आहे. येत्या वर्षात सर्व ब्रॉडगेज रेल्वेचे विद्युतीकरण करण्याचा मानस असल्याचे राज्यमंत्री दानवे यांनी सांगितले.
दोन वंदे भारत ट्रेन
देशात ४०० नव्या वंदेभारत ट्रेन सुरू केल्या जाणार असून त्यात १० ट्रेन महाराष्ट्रात सुरू होणार आहे. मुंबई-शिर्डी व मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत ट्रेनना येत्या १० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखविणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.
सीएसएमटीच्या विकासाला १८०० कोटी
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या विकासावर १८०० कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी यावेळी सांगितले.
जालना व औरंगाबाद रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण
जालना व औरंगाबाद रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी विशेष तरतूद आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी २५० कोटी तर जालना रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी १७५ कोटींची तरतूद केल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
विजय दर्डा यांचे प्रयत्न
वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे मार्ग करण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे विदर्भ व मराठवाडा या भागांना जोडणारा हा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पात प्राधान्याने भरीव तरतूद केली जाईल, असेही रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी सांगितले.
दिलेला शब्द पाळल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावराहेब दानवे यांचा आभारी आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आभारी आहे. त्यांनी मला आश्वासन दिले होते की, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून आम्ही हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करु.
- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड
लोकमत वृत्तपत्र समूह व माजी राज्यसभा सदस्य