मुंबई - नाना पटोले अजूनही आरएसएसशी जोडले आहेत. त्यातूनच त्यांनी निवडणुकीचं काम केले. प्रियंका गांधी आल्यानंतरही राज्यातील काँग्रेस संघटनेचा कुणी पदाधिकारी तिथे नसेल तर त्याची जबाबदारी कुणी घेतली पाहिजे? पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या माध्यमातून मला पक्षाचं चिन्ह मिळालं, पण माझ्या मतदारसंघात मोजकेच पदाधिकारी वगळता कुणीही प्रचाराला आलं नाही. चिन्ह पक्षाने दिले तरी एकप्रकारे मला अपक्षच ही निवडणूक लढावी लागली असं सांगत नागपूर मध्यचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबईत आज काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीत बंटी शेळके यानी थेट नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बंटी शेळके म्हणाले की, गेल्या निवडणुकीतही हेच झाले. संघटनेने आम्हाला पाठबळ दिले नाही. अवघ्या ४ हजार मतांनी मागील निवडणुकीत माझा पराभव झाला. यावेळी पक्षश्रेष्ठींकडून नेमण्यात आलेल्या उमेदवारांच्या स्क्रिनिंग कमिटीत माझे नावही नव्हते. पक्षश्रेष्ठींचे किती प्रेम आहे ते दिसून आले. २०१९ पासून बंटी शेळकेला तिकिट मिळणार नाही असं वातावरण तयार करण्यात येत होते. त्यामुळे वातावरण निर्मिती झाली. माझा स्पष्ट आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आहे. मी आजपर्यंत कुणाची तक्रार केली नाही. बैठकीत नाना पटोले इतर नेत्यांसमोर मी माझं म्हणणं मांडलं असं त्यांनी माध्यमांना सांगितले.
तसेच पक्षाचे आज जे हाल झालेत, त्यात जेवढे काही उमेदवार पडले असतील तर त्यामागे नाना पटोलेंचा हात आहे. आजपर्यंत मी कुणाची तक्रार केली नाही. येणाऱ्या काही महिन्यात महापालिका निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांवर अन्याय व्हायला नको. ज्यांनी मेहनत केली आहे त्यांच्याकडे पक्षश्रेष्ठींचे लक्ष केंद्रीत झाले पाहिजे. राहुल गांधी यांच्या माध्यमातून मला यंदा तिकिट मिळाले. आम्ही मेहनत करतोय. राहुल गांधी यांच्या टीमकडून पडताळणी झाली पाहिजे. जर प्रियंका गांधी यांच्या रोड शोमध्ये काँग्रेस कार्यकर्ते इतक्या संख्येने नव्हते. शेळके कुटुंबाची ही निवडणूक नव्हती. काँग्रेसनं जो सर्व्हे केला होता त्यातून मला उमेदवारी मिळाली. नाना पटोलेंनी माझे नावही उमेदवार छाननी प्रक्रियेत दिले नाही. आज मी स्वत:च्या बळावर निवडणूक लढलो. हातावर मोजण्याइतके कार्यकर्ते प्रचारात होते, बाकीचे कुठे होते..? असा संतप्त सवाल बंटी शेळके यांनी उपस्थित केला.
दरम्यान, माझ्यावर राजकीय गुन्हे सर्वाधिक आहेत. प्रत्येक ठिकाणी मी आवाज उचलला आहे. राहुल गांधींनी म्हटलंय, अन्यायाविरोधात आवाज उचला. प्रियंका गांधी यांचा रोड शो झाला तिथे विरोधक आले त्यांच्यासमोर मी एकटा भिडलो. मी द्वेष केला नाही तर हात जोडले. आरोप प्रत्यारोप करत नाही जे वास्तव आहे ते मी मांडलंय असंही बंटी शेळके यांनी सांगितले.