- मोसीन शेख
मुंबई: राज्यात महाविकासआघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून राजेश टोपे यांचे नाव मंत्रिमंडळात निश्चित मानले जात असून त्याचबरोबर आमदार कैलास गोरंट्याल यांना सुद्धा राज्यमंत्री म्हणून संधी मिळणार का?, याबद्दल तर्क-वितर्क लावले जात आहेत.
युती सरकारच्या काळात जालना जिल्ह्याला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या रूपाने तीन मंत्रीपद मिळाले होते. त्यात आता केंद्रातील राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे एकमेव मंत्री कार्यरत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत जालना जिल्ह्याला पुन्हा लाल दिवा मिळण्याची शक्यता आहे.
मंत्रीपदाच्या माध्यमातून संघटन मजबूत करणे हे उद्दीष्ट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने ठरवले आहे. तर जालना जिल्ह्याला गेल्यावेळप्रमाणे पुन्हा एकदा दोन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार राजेश टोपे यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून मंत्रीपद मिळणार हे निश्चित मानले जाते. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते. तसेच आमदार गोरंट्याल देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत असून त्यांना राज्यमंत्रीपद की कॅबिनेट मंत्रीपद मिळणार हे अद्याप निश्चित नाही. मात्र अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते हे भाजप आणि शिवसेनेत जात असताना राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीवर निष्ठा कायम ठेवली. तर काँग्रेस पक्षाची सर्वत्र धूळधाण होत असताना जालन्यात मात्र, कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसचा गड निष्ठा ठेवून कायम ठेवला. २०१६ मध्येही नगर पालिकेच्या निवडणुकीत गोरंट्याल यांनी पालिका आपल्या ताब्यात ठेवून काँग्रेसचे अस्तित्व जालन्यात स्वत:च्या हिमतीवर कायम ठेवले. त्यामुळे अत्यंत अडचणीच्या काळात गोरंट्याल आणि टोपे यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून विजय मिळविल्याने या दोन्ही आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.