खाती ठरली, पण घोषणा नाहीच, गृह अनिल देशमुखांकडे, तर महसूल थोरातांकडे, शिंदे यांना नगरविकास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 06:31 AM2020-01-05T06:31:15+5:302020-01-05T06:31:55+5:30
राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतिक्षित खातेवाटपास अंतिम स्वरूप देण्यात आले असले तरी त्याची अंतिम घोषणा होणे बाकी आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतिक्षित खातेवाटपास अंतिम स्वरूप देण्यात आले असले तरी त्याची अंतिम घोषणा होणे बाकी आहे. अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:कडे सामान्य प्रशासन तसेच विधी व न्याय ही खाती ठेवणार आहेत. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख गृहमंत्री, शिवसेनेचे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात महसूल, तर अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील.
मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी ७.३० वाजता मंत्रिमंडळाची खातेवाटप यादी राज्यापालांकडे पाठविली, अशी माहिती ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी दिली. सामाजिकदृष्ट्या दोन महत्त्वाच्या खात्यांपैकी आदिवासी विकास खाते काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य के. सी. पाडवी यांच्याकडे, तर सामाजिक न्याय खाते राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविले आहे. सर्व संभाव्य नावे ‘लोकमत’च्या हाती आहेत. तिन्ही पक्षांतर्फे नावे व खाती नक्की करण्यात आली असून, राज्यपालांच्या मान्यतेसाठी यादी पाठविण्यात आली असल्याचे समजते. काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्याला कोणती खाती द्यायची, हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी निश्चित केले. त्यांच्या सहीचे पत्र उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. राष्ट्रवादीतर्फेही शरद पवार यांच्या सहीचे असेच पत्र दिले गेले. त्यानंतर खाती निश्चित झाली.
आधी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये गृहखाते स्वत: फडणवीस यांच्याकडे होते. आता अनिल देशमुख यांच्या रूपाने पुन्हा एकदा विदर्भाला गृह खाते मिळाले आहे. नितीन राऊत यांना बांधकाम खाते हवे होते. पण राऊत यांना ऊर्जा खाते दिले आहे.
>महाविकास आघाडीचे सरकार
शिवसेना
उद्धव ठाकरे : मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन,
विधी व न्याय । एकनाथ शिंदे : नगरविकास व सार्वजनिक उपक्रम (एमएसआरडीसी) । सुभाष देसाई : उद्योग । आदित्य ठाकरे : पर्यावरण व पर्यटन । उदय सामंत : उच्च व तंत्रशिक्षण व राजशिष्टाचार । अनिल परब : परिवहन आणि संसदीय कामकाज । शंकरराव गडाख : जलसंधारण । संदीपान भुमरे : रोजगार हमी योजना । गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता । दादा भुसे : कृषी । संजय राठोड : वने
राज्यमंत्री : शंभूराज देसाई : गृह (ग्रामीण), वित्त व पणन । बच्चू कडू : शालेय शिक्षण, कामगार, जलसंपदा । अब्दुल सत्तार : महसूल व ग्रामविकास । राजेंद्र यड्रावकर : आरोग्य, अन्न व औषधी प्रशासन आणि सांस्कृतिक कार्य.
>राष्ट्रवादी
अजित पवार : वित्त व नियोजन । जयंत पाटील : जलसंपदा । छगन भुजबळ : अन्न व नागरी पुरवठा । अनिल देशमुख : गृह । दिलीप वळसे पाटील : उत्पादन शुल्क व कामगार । नवाब मलिक : अल्पसंख्याक आणि कौशल्य विकास । धनंजय मुंडे : सामाजिक न्याय । हसन मुश्रीफ : ग्रामविकास । बाळासाहेब पाटील : सहकार व पणन । राजेंद्र शिंगणे : अन्न व औषध प्रशासन । राजेश टोपे : आरोग्य । जितेंद्र आव्हाड : गृहनिर्माण.
राज्यमंत्री : दत्तात्रय भरणे : जलसंधारण ।
अदिती तटकरे : उद्योग, पर्यटन, क्रीडा ।
संजय बनसोडे : पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम. । प्राजक्त तनपुरे : नगरविकास, ऊर्जा व उच्च व तंत्रशिक्षण.
>काँग्रेस : बाळासाहेब थोरात : महसूल । अशोक चव्हाण : सार्वजनिक बांधकाम
नितीन राऊत : ऊर्जा । के.सी. पाडवी : आदिवासी विकास । विजय वडेट्टीवार : मदत पुनर्वसन, ओबीसी, खारभूमी । सुनील केदार : क्रीडा व युवक कल्याण, पशुसंवर्धन व दुग्धविकास । वर्षा गायकवाड : शालेय शिक्षण । यशोमती ठाकूर : महिला व बालविकास । अमित देशमुख : वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य । अस्लम शेख : वस्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे.
राज्यमंत्री : सतेज पाटील : गृह, गृहनिर्माण (शहर) । विश्वजित कदम : कृषी आणि सहकार.