राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होणार; काहींची गच्छंती काहींना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 02:08 AM2019-06-07T02:08:02+5:302019-06-07T06:41:22+5:30
मुख्यमंत्र्यांची अमित शहांशी चर्चा, नवीन प्रदेशाध्यक्षही लवकरच
नवी दिल्ली/मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल आणि नवीन भाजप प्रदेशाध्यक्षांचे नाव निश्चित करण्यासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी जागावाटपाचा काय फॉम्यूर्ला असावा या बाबतही चर्चा झाल्याचे समजते.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून मुंबईत सुरू होत आहे. त्यापूर्वी विस्तार केला जाईल. ‘तुमच्या मनात जे आहे त्या बाबत चर्चा करण्यासाठीच मी आलो आहे’, असे सूचक उद्गार मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना काढले.
भाजपच्या कोट्यातील चार तर शिवसेनेच्या कोट्यातील एक मंत्रीपद रिक्त आहे. भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच भाजपत प्रवेश करतील आणि त्यांना मंत्रिपदही दिले जाईल, अशी दाट शक्यता आहे. फडणवीस मंत्रिमंडळाचा केवळ विस्तार होणार नसून फेरबदलदेखील करण्यात येणार आहे. त्यामुळे काही मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मंत्रीमंडळात फेरबदलाची तारीख मात्र अद्याप ठरलेलीे नाही. अमित शहा यांनी ९ जून रोजी महाराष्ट्रातील भाजपची कोअर कमिटी आणि प्रमुख प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली असून लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा आणि चार महिन्यांनंतर होणाºया विधानसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करणे हा बैठकीचा विषय असेल.
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे केंद्रात राज्यमंत्री झाल्याने नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्यात येणार आहे. त्या संदर्भातही फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी आज चर्चा केली. ९ तारखेच्या दिल्लीतील बैठकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष नेमणार की त्या दिवशी निर्णय होणार या बाबत उत्सुकता आहे. नवे गृहमंत्री म्हणून अमित शहा यांना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था स्थिती, नक्षली कारवाया तसेच दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती दिली.