आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एसीपींसह कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 10:14 PM2017-09-07T22:14:29+5:302017-09-07T22:14:39+5:30
ठाणे मुख्यालयाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे आणि तिचा भावी पती मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे या दोघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे, दि. 7 - ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार (२१, रा. कळवा, मनीषानगर) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठाणे मुख्यालयाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे आणि तिचा भावी पती मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे या दोघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी चौकशी सुरू असल्याने दोघांनाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सुभद्राचे अमोलसमवेत लग्न ठरले होते. त्यामुळेच बुधवारी हे दोघे जेवणासाठी तिच्या कळवा, मनीषानगर येथील घरी एकत्र बसले असताना एसीपी निपुंगे यांचे तिच्या मोबाइलवर वारंवार फोन येत होते. वारंवार येणाºया फोनची चौकशी केल्यानंतर सारिकाने एसीपी निपुंगे यांच्याकडून होणाºया त्रासाची अमोल याला माहिती दिली. ‘तुझ्या ड्युटीची सेटिंग करून देतो, तू मला भेटायला ये’, असे ते सांगत असल्याचेही तिने त्याला सांगितले. यातूनच त्यांच्यातही काहीतरी बिनसले. काहीतरी वादही झाला. तिच्या आत्महत्येला एसीपींच्या मानसिक छळाबरोबरच अमोलच्या वादाचीही किनार असल्याचा जबाब तिचा नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल भाऊ सुजित पवार याने कळवा पोलिसांकडे रात्री उशिरा नोंदवला.
याच जबाबाआधारे निपुंगे आणि फापाळे या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका कॉन्स्टेबलच्या आत्महत्येप्रकरणी एसीपी दर्जाच्या अधिका-याविरुद्ध प्रथमच गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेले एसीपी निपुंगे यांची आठच दिवसांपूर्वी भिवंडी वाहतूक विभागातून ठाणे मुख्यालयात बदली झाली होती. याप्रकरणी कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ अधिक तपास करत आहेत.
...आणि एसीपींनी पळ काढला
सुभद्राने आत्महत्या केल्याची माहिती अमोल याच्याकडून तिचा भाऊ सुजित याला समजल्यानंतर तो तिच्या घरी आला. त्याच काळात दुपारी ३ वाजताच्या सुमारास तिच्या फोनवर वारंवार फोन करणारे निपुंगे हेही तिथे आले होते. पण तिने आत्महत्या केल्याचे दृश्य त्यांनी पाहिल्यानंतर ते कोणालाही काहीही न सांगता तिथून निघून गेले, अशीही माहिती कळवा पोलिसांना मिळाली.
............................................
वारंवार येणा-या फोनमुळे संशय वाढला
सुभद्राला वारंवार निपुंगे यांचे फोन येत होते. एखादा वरिष्ठ अधिकारी महिला कॉन्स्टेबलला सलग इतक्या वेळा का फोन करतो, यातून अमोलच्या मनातही संशय वाढला. या फोननंतर त्यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली. त्यानंतर त्याला एक फोन आला. तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर पडला. तोपर्यंत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
--------------------------
‘‘आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एसीपींसह कॉन्स्टेबल असलेल्या सारिकाच्या भावी पतीविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. सर्व बाजूंची सखोल चौकशी करण्यात येत आहे.’’
डी.एस. स्वामी, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर