तीन गुन्हेगारांना अटक : प्रकृती स्थिर नागपूर : चंद्रपूर घुग्गुस येथील कुख्यात गुन्हेगार व कोळसा माफिया शगीर सिद्दीकी याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. याप्रकरणी गुन्हेगार आणि शगीरचे साथीदार कुख्यात शक्ती मनपिया, जाकीर खान आणि आशीष पारोचे याला अटक करण्यात आली आहे. परंतु या प्रकरणी पोलीस ज्या पद्धतीने गुप्तता पाळत आहेत, त्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जखमी शगीरची प्रकृती सध्या स्थिर आहे. मंगळवारी दुपारी धरमपेठ येथे एका आॅडी कारमध्ये शगीर सिद्दीकी याच्यावर गोळी चालवण्यात आली होती. शगीर आॅडी चालवित होता. त्यामुळे गोळी लागताच कार अनियंत्रित होऊन अॅड. साहील भांगडे यांच्या कार्यालयात घुसली. आॅडीमध्ये असलेले आरोपी शगीरला रुग्णालयात घेऊन गेले. पोलिसांना उशीरापर्यंत हा केवळ एक अपघात असल्याचे सांगितले जात होते. डॉक्टरांनी जखमीच्या डोक्यात गोळी असल्याचे सांगितल्यावर पोलिसांना धक्काच बसला. शगीरला सीटच्या ‘हेड सपोर्टर’च्या मागच्या बाजूने गोळी मारण्यात आली होती. सूत्रानुसार शक्ती मनपिया सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होता. परंतु त्याने चुकीने गोळी चालल्याचा नंतर उल्लेख केला होता. २४ तासापेक्षा अधिक चाललेल्या विचारपूस नंतर बुधवारी तिघांनाही अटक करण्यात आली. सुपारी देऊन खूनाची शक्यता सूत्रानुसार शगीरला मारण्याची सुपारी देण्यात आली होती. त्याला मारण्याची योजना तुरुंगात बनली होती. न्यायालयात पेशी दरम्यान मुख्य सूत्रधाराची आरोपीसोबत भेट झाली. शगीरने खूप संपत्ती जमविली होती. ही संपत्ती अनेक कोळसा माफिया आणि अधिकाऱ्यांनाही खटकत होती. त्यामुळे शगीरला योजनाबद्ध पद्धतीने हटविण्याचा मार्ग अवलंबिण्यात येत होता. परंतु आरोपीच्या चुकीमुळे योजना फेल ठरली. सूत्रानुसार शगीरच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, दंगा, मारहाण, शासकीय अधिकाऱ्यावर हल्ले आदींसह आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा तडीपार अवधी संपला आहे. तो कोळशाशी संबंधित मोठे सौदे नागपुरातच करीत असे. आरोपी बॉडीगार्ड बनून त्याच्यासोबत राहत होते. शगीर काही दिवसांपासून जाकीर खान याच्या ताजाबाद येथील घरीच राहत होता. घटनेनंतर आरोपींनी स्वत:ला वाचवण्यासाठी पोलिसांची दिशाभूल केली. त्यांनी अगोदर बाईक चालकांनी गोळीबार केल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, गोळी चालल्यानंतर त्यांनी कारच्या खिडकीच्या काचा बंद केल्या होत्या. त्यांचे म्हणणे होते की, शगीर गोकुळ वृंदावन हॉटेलमधून निघून ज्वेलरी शोरूममध्ये जात होता. याच महिन्यात शगीरच्या कुटुंबात लग्न आहे. त्यामुळे लग्न सोहळ्यासाठी तो आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेशात जाणार होता. त्याच्याजवळ हिरेसुद्धा होते. तो लग्नासाठी दागिने खरेदी करण्यासोबतच हिरेसुद्धा तपासून घेणार होता. त्यामुळे त्याच्याजवळ जवळपास १ कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम आॅडीमध्ये असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर हिरे आणि रुपयांबाबत पोलिसांना कुठलीच माहिती मिळालेली नाही. रुग्णालयात नेतानाच आरोपींनी पैसे आणि हिरे आपल्या भरवशाच्या लोकांजवळ सोपविले असल्याची चर्चा आहे. या संबंधात एका तरुणाची विचारपूस सुद्धा करण्यात आली. त्याच्या बहिणीचे लग्न असल्याने त्याला सोडून देण्यात आले.
गोळी चालण्याचे कारण अजूनही गुलदस्त्यात
By admin | Published: December 04, 2014 12:39 AM