‘समृद्ध जीवन’वर सीबीआयच्या धाडी

By admin | Published: December 30, 2015 03:51 AM2015-12-30T03:51:55+5:302015-12-30T03:51:55+5:30

सेबीने मनाई केल्यानंतरही गुंतवणूकदारांकडून कोट्यवधींच्या ठेवी गोळा केल्याप्रकरणी समृद्ध जीवन फाउंडेशनचे महेश मोतेवार यांच्या विविध ठिकाणच्या मालमत्ता व देशभरातील

CBI searches on 'rich life' | ‘समृद्ध जीवन’वर सीबीआयच्या धाडी

‘समृद्ध जीवन’वर सीबीआयच्या धाडी

Next

पुणे/उस्मानाबाद : सेबीने मनाई केल्यानंतरही गुंतवणूकदारांकडून कोट्यवधींच्या ठेवी गोळा केल्याप्रकरणी समृद्ध जीवन फाउंडेशनचे महेश मोतेवार यांच्या विविध ठिकाणच्या मालमत्ता व देशभरातील ५८ ठिकाणांवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी धाडी टाकल्या. ओडिशा येथील चीट फंडसंदर्भातील दाखल गुन्ह्यांच्या तपासासाठी सीबीआयने ही कारवाई केली. दरम्यान, उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील दूध डेअरी फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेले महेश मोतेवारला न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
समृद्ध जीवनचे सर्वेसर्वा महेश मोतेवार आणि त्यांच्या चीटफंड कंपनी विरोधात ओडिशामध्येही गुन्हे दाखल आहेत. याचा तपास सीबीआयमार्फत सुरू आहे. या तपासासाठी आलेल्या पथकाने मंगळवारी मोतेवारशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. यामध्ये कंपनीचे मालक, संचालक, अधिकारी यांची काही घरे, कार्यालयांचा समावेश आहे. चीट फंडच्या नावाखाली गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा आरोप समृद्ध जीवनवर केला जात आहे. पुण्यामध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात सेबीनेही मोतेवार यांच्यासह समृद्ध जीवनवर गुन्हा दाखल केलेला आहे.

तुळजापुरात वैद्यकीय तपासणी
महेश मोतेवारला उस्मानाबाद पोलिसांनी ताब्यात घेऊन सोमवारी उस्मानाबादेतील एलसीबीच्या कार्यालयात आणले होते़ त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी जिल्हा रुग्णालयात होईल, असा तर्क लावण्यात येत होता़ मात्र, पोलिसांनी त्याला तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली़

‘समृद्ध जीवन’ हे नाव देऊन गुंतवणूक, पतसंस्था, बांधकाम आदी व्यवसायांमध्ये उतरलेल्या मोतेवारांनी अवघ्या काही वर्षांतच शेकडो कोटींचा व्यवसाय उभा केला.
हा डोलारा तकलादू असल्याचे अनेकदा समोर आले, परंतु कायदेशीर पुरावे मिळत नसल्यामुळे मोतेवारांविरुद्ध कारवाई होत नव्हती.
सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडूनही गुंतवणुकीद्वारे चालणाऱ्या फसवणुकीचा तपास सुरू आहे, तसेच पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडूनही तपास सुरू आहे.
कोणत्याही प्रकारची गुंतवणूक घेण्यास सेबीने ‘समृद्ध जीवन’ला निर्बंध घातले होते, परंतु तरीदेखील गुंतवणूक सुरूच ठेवल्याने, सेबीने डेक्कन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

उस्मानाबादचे प्रकरण काय?
येणेगूर (जि़ उस्मानाबाद) येथे शिवचंद्र रेवते, त्यांच्या पत्नी व प्रमोद पुजार यांनी रेवते अ‍ॅग्रो प्रा़ लि़ येणेगूर या नावाने डेअरी प्लॅन्ट सुरू केला होता़ या प्लॅन्टमध्ये तात्यासाहेब शिवगोंडा पाटील व इतरांना भागीदार म्हणून घेण्यात आले होते़ रेवते दाम्पत्य व पुजार यांनी तात्यासाहेब पाटील व इतर भागिदारांना कोणतीही सूचना न देता, कंपनी विक्रीबाबत महेश मोतेवारशी करार केला. भागीदार असतानाही वरील लोकांनी आपली फसवणूक केल्याची फिर्याद तात्यासाहेब पाटील यांनी उमरगा कोर्टात दिली होती़ कोर्टाच्या आदेशावरून २०१३ मध्ये कंपनीच्या तीन संचालकांसह मोतेवारविरुध्द मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: CBI searches on 'rich life'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.