सीडीआर प्रकरण : सेलीब्रिटींचीही चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 05:40 AM2018-03-05T05:40:48+5:302018-03-05T05:40:48+5:30

ठाणे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बेकायदा सीडीआर (कॉल डिटेल्स) प्रकरणात चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांची नावे समोर येत आहेत. लवकरच या सेलीब्रिटींची चौकशी होण्याची शक्यता आहे.

 CDR Case: Celebrities' inquiries | सीडीआर प्रकरण : सेलीब्रिटींचीही चौकशी

सीडीआर प्रकरण : सेलीब्रिटींचीही चौकशी

Next

ठाणे - ठाणे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बेकायदा सीडीआर (कॉल डिटेल्स) प्रकरणात चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांची नावे समोर येत आहेत. लवकरच या सेलीब्रिटींची चौकशी होण्याची शक्यता आहे.
मोबाइल फोन्सचे सीडीआर बेकायदा मिळवणा-या आरोपींचे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने जानेवारी महिन्यात उघडकीस आणले. काही खासगी गुप्तहेर आणि यवतमाळच्या एका पोलीस कर्मचा-यासह ११ आरोपींना पोलिसांनी या प्रकरणामध्ये आतापर्यंत अटक केली. देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्या अटकेनंतर या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले. ठाणे न्यायालयाने रजनी पंडित यांचा जामीन अर्ज फेटाळला असून त्या अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.
या प्रकरणातील आरोपींकडून पोलिसांनी लॅपटॉप, मोबाइल फोन हस्तगत केले. त्याआधारे आरोपींनी आजवर किती मोबाइलधारकांचे सीडीआर काढले आणि ते कुणाकुणाला पुरवले, याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार, आरोपींच्या ग्राहकांमध्ये काही सेलीब्रिटींचा समावेश असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. या सेलीब्रिटींची लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी तसे संकेतही दिले आहेत. मात्र, या सेलीब्रिटींची नावे उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला. पोलिसांच्या रडारवर तीन सेलीब्रिटींची नावे आहेत. अभिनयाच्या बळावर चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळवलेल्या एका हिंदी चित्रपट अभिनेत्याचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय, एका नावाजलेल्या अभिनेत्याशी वाद झाल्यामुळे वेगळ्या कारणाने चर्चेत आलेल्या एका मोठ्या अभिनेत्रीचीही चौकशी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

मोबाइल कंपन्यांची चौकशी रखडली

सीडीआर प्रकरणात अटक केलेल्या आरोपींनी बेकायदेशीर मार्गाने सीडीआर मिळवण्यासाठी काही मोबाइल कंपन्यांच्या नोडल आॅफिसर्सशी हातमिळवणी केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. या मोबाइल कंपन्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करून पोलिसांनी त्यांची चौकशी केली जाणार असल्याचेही सांगितले होते. मात्र, महिना उलटून गेला तरी पोलिसांनी अद्याप एकाही मोबाइल कंपनीच्या अधिकाºयांची या प्रकरणामध्ये चौकशी केलेली नाही.

यवतमाळ पोलिसांच्या वेबसाइटचा नव्याने शुभारंभ
सीडीआर प्रकरणात पोलिसांनी यवतमाळ येथील सायबरतज्ज्ञ अजिंक्य नागरगोजे याच्यासह यवतमाळचा पोलीस शिपाई नितीन खवडे यालाही अटक केली होती. यवतमाळ पोलिसांची अधिकृत वेबसाइट अजिंक्यनेच तयार केली होती. त्या वेळी यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड चोरून अजिंक्यने काही सीडीआर मिळवले होते. विशेष म्हणजे त्याला ठाणे पोलिसांनी अटक केल्यानंतर यवतमाळ पोलिसांची वेबसाइट हॅक झाली होती.

मुख्य आरोपी फरारच
सीडीआर प्रकरणाचा मुख्य आरोपी सौरव साहू हा दिल्ली येथील रहिवासी आहे. अशाच एका प्रकरणामध्ये त्याला यापूर्वीही एकदा अटक करण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतही सौरव साहूचे नाव समोर आले. तोच या प्रकरणाचा मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी जाहीरही केले. त्यानंतर, सौरवच्या अटकेसाठी ठाणे पोलिसांचे पथक दिल्ली येथे जाऊन आले. मात्र, महिना उलटूनही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

Web Title:  CDR Case: Celebrities' inquiries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा