मुंबई : शिवजयंती १९ फेब्रुवारी रोजी साधेपणाने साजरी केल्यानंतर आता ३१ मार्च रोजी असणारी तिथीनुसार शिवजयंतीदेखील साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तिथीनुसार शिवजयंतीसाठी शुक्रवारी शासनाच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. यासाठी सर्व सण, उत्सव तसेच कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तिथीनुसार शिवजयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी येणारी शिवजयंती सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून केवळ १०० जणांच्या उपस्थितीत साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणांहून अनेक शिवप्रेमी शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला व इतर गडांवर मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता किल्ल्यांवर एकत्र न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवजयंतीनिमित्त अनेक ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या पोवाडे, मर्दानी खेळ, व्याख्यान, गाणे, नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी या सर्वांचे ऑनलाइन प्रक्षेपण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रभात फेरी, बाइक रॅली, मिरवणुकांवरदेखील बंदी घालण्यात आली असून, केवळ १०० जणांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात भासणारा रक्ताचा तुटवडा तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठिकठिकाणी रक्तदान शिबिर व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. यासाठी सर्व सण, उत्सव तसेच कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तिथीनुसार शिवजयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.