सेन्सॉर प्रेक्षकांनी लावायला हवे; सरकारने नव्हे : सय्यद असगर वजाहत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 08:18 PM2019-10-22T20:18:56+5:302019-10-22T20:22:13+5:30
लेखक किंवा नाटककार कधी थांबत नाही आणि थांबणारही नाही.
पुणे : ‘नाटक’ हे समाजसापेक्ष असते. प्रेक्षकांना नाटक किंवा एखादी कलाकृती चांगली नाही असे वाटले तर प्रेक्षकचं ते नाटक पाहायचे कि नाही यावर निर्णय घेतील. ते प्रेक्षकांनीच ठरवलं पाहिजे.‘सेन्सॉर’ प्रेक्षकांनी लावायला हवे, सरकारने नव्हे’,अशा शब्दातं जामिया मिलिया इस्लामियॉं युनिव्हर्सिटीचे माजी हिंदी विभागप्रमुख आणि ज्येष्ठ लेखक प्रा.सय्यद असगर वजाहत यांनी कलाकृतींवरील ‘सेन्सॉरशीप’ वर टीका केली.
दिल्लीच्या नँशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) च्या वतीने आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या( एमईएस) कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसच्या सहकार्याने 90 दिवसांची कार्यशाळा दि. 22 जानेवारीपर्यंत पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेच्या उदघाटनानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
कार्यशाळेप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एमईएसच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धधे आणि एनएसडीचे प्रभारीसंचालक प्रा. सुरेश शर्मा तसेच ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे,ज्येष्ठ नाटककार शफाहत खान, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे वरिष्ठसल्लागार ए.एन.रॉय, मएसोच्या नियामक मंडळाच्या आणि मएसोकॉलेज आॅफ परफॉर्मिंग आर्टसच्या सल्लागार समितीच्या सदस्य डॉ.माधवी मेहेंदळे, मएसो कॉलेज आॅफ परफॉर्मिंग आर्टसचे सल्लागार विद्यानिधी वनारसे व ज्येष्ठ रंगकर्मी किरण यज्ञोपवित उपस्थित होते.
नाटय-चित्रपट-साहित्य क्षेत्रातील लेखकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सरकारकडून लादण्यात येणारी ‘सेन्सॉरशीप’ याविषयांवर सय्यद असघर वजाहत यांनी परखड भाष्य केले.’प्रेक्षक’हा नाटकाचा महत्वपूर्ण घटक आहे. प्रेक्षक समाजातील वास्तविकता नाटकामध्ये पाहू इच्छितो. ज्या समाजातून प्रेक्षक आला आहे. त्याच्या समस्यांचे प्रतिबिंब नाटकामध्ये उमटावे असे त्याला वाटते असे सांगून ते म्हणाले, नाटककार आणि लेखकांच्या लेखनावर कितीही बंदी घातली तरी ते नवीन मार्ग निर्माण करतात. चिन्ह, प्रतीक, प्रतिमा, भावभावना याचा आधार घेऊन ते मार्गक्रमण करत राहतात. त्यामुळे लेखनावर कितीही बंदी घातली तरी ते लेखन करीतच राहातील.
1975 च्या आणीबाणीच्या काळातही सरकारने लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. तरीही आम्ही लेखन करतच राहिलो. लेखक किंवा नाटककार कधी थांबत नाही आणि थांबणारही नाही. ‘सेन्सॉर’ लोकांनी लावायला पाहिजे, सरकारने नव्हे. नाटक आमच्यासाठी चांगले नाही असे जर लोकांना वाटले तर तेच नाटक पाहायला जाणार नाहीत. सुशिक्षित देशांमध्ये समाज ‘सेन्सॉर’ लावू शकतो. केवळ लोकांमध्ये जागरूकता असणे गरजेचे आहे. त्यांना नाट्य आणि चित्र साक्षर केले पाहिजे. लोकांनीच म्हटले की आम्हाला एखादी कलाकृती पाहायची नाही तर कोण काय करू शकेल? त्यामुळे चांगले किंवा वाईट हे लोकांना ठरवू देत याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नाट्यलेखन कार्यशाळोविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, आजपर्यंत कधीही तीन महिन्यांची कार्यशाळा झालेली नाही हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. कुणाला कला शिकविली जात नाही अशी वक्तव्य केली जातात. आपण प्रतिभेचे महत्व नाकारू शकतच नाही. पण त्या प्रतिभेला संधी मिळणे गरजेचे आहे. कुणी गात असेल त्याला चांगला गुरू मिळाला तर तो उत्तम गायक होऊ शकतो. तसाच कुणी लेखन करत असेल तर त्याच्या लेखानाला उभारी मिळेल. नाटयलेखन आव्हानात्मक नक्कीच आहे. नाट्य लेखनात वैज्ञानिक जाणीव गरजेची आहे.
..........
केवळ विरोधाला विरोध नसावा
कलाकार एका पक्षाच्या झेंड्याखाली नसतो. वेगळी विचारसरणी नक्कीच असू शकते. कलाकार चुकीच्या गोष्टींवर नेहमीच आवाज उठवत आला आहे. हे आज नाही पूर्वापार चालत आले आहे. चुकीच्या गोष्टींना विरोध करणे नवीन नाही. विरोध करावा पण केवळ विरोधाला विरोधाला नसावा. जे आज प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. संवाद साधायला हवा. चर्चा व्हायला हव्यात. पण कुणी संवाद साधायला तयार नसते. मी काश्मिरच्या विस्थापित पंडितांवर नाटक लिहिले. मला सरकारकडून नव्हे उलट समाजातून अधिक विरोध झाला असल्याचे एनएसडीचे संचालक प्रा. सुरेश शर्मा यांनी सांगितले.