केंद्र व राज्य सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही; ते फक्त आदेश काढत आहे : प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 12:42 PM2021-01-01T12:42:55+5:302021-01-01T12:44:16+5:30
...तर कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यात नक्कीच यश मिळाले असते.
पुणे : केंद्र व राज्य सरकारकडे अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवण्याबाबत कोणतीही अशी ठोस उपाययोजना नाही. जर त्यांच्याकडे ती असती तर किंबहुना कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यात नक्कीच यश मिळाले असते. नागरिक कोणता निर्णय घ्यावा यासंबंधात बोलतात. मात्र सरकार काही केल्या निर्णय घेण्यास तयार नाही. ते फक्त दुर्दैवाने आदेश काढत आहेत, अशी टीका बहुजन वंचित विकास आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
कोरेगाव भीमा येथे प्रकाश आंबेडकर विजयस्तंभाला शुक्रवारी ( दि. १) सकाळी अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, आतापर्यंत पुणे, मुंबईसाठी महत्वाची असलेली लोक सुरु झाली पाहिजे होती. पण दुर्दैवाने सरकार याविषयी कोणतीही ठोस भूमिका घेत निर्णय घेण्याची क्षमता दाखवत नाही कोरोनानंतर फार मोठा बदल होईल असे मला वाटत नाही.
यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोरेगाव भीमा येथे होणारा कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपात न होता मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे अनुयायांनी घऱातूनच अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे. १ जानेवारी या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस असल्याचे आम्ही मानतो असेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.