केंद्र सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे : बाळासाहेब थोरात यांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 07:11 PM2021-01-29T19:11:24+5:302021-01-29T19:22:18+5:30
कोठेही अन्याय होत असताना अण्णा शांत राहतील असे वाटत नाही..
पुणे : भाजप सत्तेच्या काळजीपोटी अण्णांना उपोषणाला न बसण्याची विनंती करत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी हिटलरशाही प्रमाणे वागत आहे. हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
पुण्यात एका पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त बाळासाहेब थोरात आले होते.त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. थोरात म्हणाले, अण्णा हजारे मोठे सामाजिक नेते आहेत. कोठेही अन्याय होत असताना अण्णा शांत राहतील अस वाटत नाही. तसेच भाजपमधील आमदारांची घरवापसीसाठी चुळबुळ सुरू आहे.अण्णांच्या वयाचा विचार करता त्यांच्या तब्बेतीची काळजी वाटते आहे.
केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकार व शेतकरी यांच्यातील ११ बैठका निष्फळ ठरल्या आहेत. त्याच दरम्यान २६ जानेवारीला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यावरून केंद्रातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. याचवेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नव्या कृषी कायद्यांविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा
नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहे. भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यानंतर शुक्रवारी देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री हे अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करणार आहेत.