१० महिने उलटूनही मिळेना रेल्वे अपघातातील मृत्यूंचे प्रमाणपत्र; औरंगाबादच्या करमाडजवळील दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 06:02 AM2021-03-28T06:02:36+5:302021-03-28T06:03:02+5:30
मृत्यू प्रमाणपत्रांअभावी मृतांची बँका व इतर ठिकाणची वारस कारवाई थांबली आहे तसेच परिवारांना सरकारी मदतही मिळालेली नाही.
शाहडोल : सुमारे १० महिन्यांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील करमाडजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेल्या मध्य प्रदेशातील १६ स्थलांतरित मजुरांची मृत्यू प्रमाणपत्रे अजूनही त्यांच्या कुटुंबीयांना मिळालेली नाहीत. त्यामुळे पीडित परिवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मृत्यू प्रमाणपत्रांअभावी मृतांची बँका व इतर ठिकाणची वारस कारवाई थांबली आहे तसेच परिवारांना सरकारी मदतही मिळालेली नाही.
गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात ८ मे रोजी पहाटे ही दुर्घटना घडली होती. मध्य प्रदेशातील एकूण १६ मजूर आपल्या गावी परतण्यासाठी जालन्याहून पायीच भुसावळला निघाले होते. करमाडजवळ ते रेल्वे रुळावर झोपले असताना एका भरधाव मालगाडीने त्यांना चिरडले होते. यातील ११ जण शाहडोल जिल्ह्यातील, तर ५ जण उमरिया जिल्ह्यातील होते.
पत्र लिहिले आहे
आपली दोन मुले अपघातात गमावणारे गजराजसिंग यांनी सांगितले की, मृतांची बँक खाती परिचालित करण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्रांची गरज आहे. एसडीएम दिलीप पांडे यांनी सांगितले की, अपघात ज्या ठिकाणी घडला तेथील प्रशासनच मृत्यू प्रमाणपत्र देऊ शकते. आम्ही अलीकडेच औरंगाबाद प्रशासनास त्यासंबंधी पत्र लिहिले आहे.