पुणे : राज्यात एमएचटी-सीईटी देणारे पाच ते साडे पाच लाख विद्यार्थी आहे. त्यांची परीक्षा घ्यायची असल्यास जिल्हा, तालुका स्तरावर त्यांना आणू शकतो का, त्याठिकाणची यंत्रणा, शारीरिक अंतर ठेवून त्यांची आसन व्यवस्था करणे अशा काही मुद्यांवर सीईटी सेलचे आयुक्तांकडून सर्वेक्षण केले जात आहे. पुढील सात-आठ दिवसांत त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी स्पष्ट केले. तसेच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास बारावी गुणांवरच प्रवेश दिला जाण्याचे संकेत सामंत यांनी दिले.
सामंत यांनी गुरूवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. राज्य शासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर तृतीय वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला असून त्यावर सर्वोच्च न्यायालयातही प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. शुक्रवारी त्यावर निकाल येणे, अपेक्षित आहे. यावर बोलताना सामंत म्हणाले, न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्यानुसार भुमिका घेतली जाईल. पण कोविड परिस्थितीमुळे परीक्षा न घेण्याची शासनाची भुमिका आहे. तेच प्रतिज्ञापत्रातही आहे. परीक्षाच घेणार नाही, असे कुठल्याही जीआरमध्ये नाही. काही जणांना त्याबाबत गैरसमज पसरविले. परिस्थिती निवळल्यानंतर गुणांकन सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल.’सीईटीबाबत अद्यापही शासनाने ठोस भुमिका घेतलेली नाही. त्याबाबत बोलताना सामंत यांनी सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगितले. ‘सीईटी यंत्रणा स्वायत्त असल्याने आयुक्तांकडून सर्वेक्षण केले जात आहे. पाच ते साडे-पाच लाख विद्यार्थ्यांना जिल्हा, तालुका किंवा विभागीय स्तरावर आपण आणु शकतो का, ही अडचण आहे. काही संस्थांच्या शाळा, वसतिगृहात क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्याठिकाणी परीक्षासाठी संगणक व इतर यंत्रणा सक्षम आहे की नाही, याची पडताळणी केली जात आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. आणीबाणीची परिस्थिती आली तर बारावीच्या गुणांवरच प्रवेश देण्याचा विचार केला जाऊ शकतो. मात्र अनेक विद्यार्थी बारावीऐवजी सीईटीसाठी चांगला अभ्यास करता. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. या सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय होईल,’ असहीे त्यांनी स्पष्ट केले.-----------निर्णय कुलगुरूंच्या चर्चेनंतरचमंत्री झाल्यापासून आजपर्यंत प्रत्येक निर्णय घेताना सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा केली आहे. मागील पाच वर्षात जेवढी चर्चा कुलगुरूंशी झाली नसेल, तेवढ्या बैठका, चर्चा मी मंत्री झाल्यावर केली आहे. काही लोक धादांत खोटे बोलून त्याचे भांडवल करत असल्याची टीका सामंत यांनी विरोधकांवर केली.--------------