सांप्रदायिक विचारांचे आव्हान सर्वांत मोठे
By admin | Published: August 22, 2016 12:45 AM2016-08-22T00:45:20+5:302016-08-22T00:45:20+5:30
देशात सर्वात मोठे आव्हान हे सांप्रदायिक विचारांचे आहे. या विचारांचा आग्रह धरीत निरपराध लोकांची हत्या करणे ही चिंताजनक बाब आहे.
पुणे : देशात सर्वात मोठे आव्हान हे सांप्रदायिक विचारांचे आहे. या विचारांचा आग्रह धरीत निरपराध लोकांची हत्या करणे ही चिंताजनक बाब आहे. भारतात गाईचा आदर सर्वजण करतात. आम्ही गाईच्या आधी आईचा सन्मान करतो. गायीला आई म्हणत नसाल तर येथे राहण्याचा अधिकार नाही, असे म्हणण्याचा अधिकार मुळातच मुख्यमंत्र्यांना कुणी दिला, असा सवाल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर येथे केला.
‘पुण्यभूषण फाउंडेशन’ (त्रिदल, पुणे) यांच्यातर्फे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना जेडीयूचे अध्यक्ष (जनता दल युनायटेड) खासदार शरद यादव यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, बालशिवाजींची पुण्याची भूमी सोन्याच्या फाळाने नांगरित असलेल्या प्रतिमेचे स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणेरी पगडीची परंपरा बाजूला ठेवत फुले पगडीने वैद्य यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शंकर बुरुंगले, बाबूराव पाटील (किवळकर), यशवंत नामजोशी, बाळासाहेब जांभूळकर, अरविंद मनोलकर, दत्ता गांधी या स्वातंत्र्यसैनिकांना गौरविण्यात आले. या प्रसंगी महापौर प्रशांत जगताप, पुरस्कार निवड समितीचे प्रमुख आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई उपस्थित होते.
‘गायीला आई म्हणत नसाल तर, तुम्हाला येथे राहण्याचा अधिकार नाही,’ असे वक्तव्य खट्टर यांनी मध्यंतरी केले होते, तोच धागा पकडत पवार यांनी स्वयंघोषित गोरक्षकांवर शरसंधान साधले. जमातवादाचे आव्हान फक्त भारतापुरते मर्यादित राहिले नसून धर्मासाठी कायदा हातात घेवून हत्या केल्या जात आहेत. गायीला आई म्हणण्याची सक्ती करणे, ही चिंताजनक परिस्थिती आहे. सावरकरांनी गायीला आई न म्हणता उपयुक्त पशू म्हटले तसेच काळाराम मंदिरात दलित व्यक्तीची पूजारी म्हणून नियुक्ती केली. सावरकरांची ही भूमिका न सांगता त्यांना हिंदुत्त्ववादी म्हणून पुढे केले जाते, अशा शब्दांत त्यांनी हिंदू रक्षकांचा खोटेपणा उघड केला.
यादव म्हणाले, देशाची प्रगती झाली आहे, पण हल्ली सत्य बोलण्यावर बंदी आली आहे. देशातील कट्टरता वाढली असून सत्य बोलणे कठीण झाले आहे. सत्य बोलाल तर दाभोलकर, कलबुर्गींप्रमाणे हत्या केली जाते. लोकांच्या भावना लगेच दुखावल्या जातात. चांगली व्यक्ती घडणे, न्यायासाठी लढणे म्हणजे समाजवाद होय.
पुरस्काराचे फॅड आले असून हल्ली पुण्यामध्ये फार पुरस्कार दिले जातात. थोरल्या बाजीरावांच्या नावाने पुरस्कार देण्याला माझा आक्षेप नाही, पण दुसऱ्या बाजीरावापर्यंत पुरस्कार येऊ देऊ नका. पाऊस-पाणी चांगले म्हणून पीक येते, पण पुरस्काराचे पीक नको, अशी उपरोधिक टिप्पणी पवार यांनी केली.
>जगासमोर इसिसच्या रूपाने जमातवादाचे आव्हान उभे राहिले आहे. आपल्या देशातही धर्माधिष्ठित भूमिका मांडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाच्या दृष्टीने हे राजकारण अत्यंत घातक आहे. जागतिकीकरणाचे परिणाम जाणवू लागल्याने समाजवादाची किरणे दिसू लागली आहेत, अशी भावना भाई वैद्य यांनी व्यक्त केली.