पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला सुरुवात होताच, उपस्थित जनसमुदायातून पालकमंत्री चंद्रकात पाटलांना उद्देशून आवाज येत होता. त्यानंतर, राज ठाकरेंनी काय काय... असा प्रश्न विचारत मोठ्या आवाजात 'चंपा' असे म्हटले. त्यानंतर, समोरील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत राज ठाकरेंच्या चंपा उच्चारणाला दाद दिली. पुण्यातील मंडईमध्ये राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पुणे आणि राज्यातील पुरावर भाष्य करत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
पुणेकर नाव ठेवण्यात लई पटाईत आहेत, असे म्हणत चंपा म्हणून चंद्रकात पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. आमचा उमेदवार चंपाची चंपी करेल, असे राज यांनी म्हटले. तसेच, सांगली अऩ् कोल्हापूराच्या पुरातून एक मंत्री कोथरुडपर्यंत वाहत आला आहे, असे म्हणत कोथरुडमधील भाजपाचे उमेदवार चंद्रकात पाटलांना टोला लगावला. सोशल मीडियावर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधक कार्यकर्त्यांकडून ज्याप्रमाणे खिल्ली उडविण्यात येते त्याचप्रमाणे अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचा नामोल्लेख केला होता. पवार कुटुंबीयातील तरुण भविष्यात भाजपामध्ये येऊ शकतात, आणि आले तर त्यांचे स्वागत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावरुन अजित पवारांना पत्रकाराने प्रश्न विचारला होता. त्यावेळी, अजित पवारांनी थेट चंपा असाच उल्लेख चंद्रकांत पाटील यांचा केला होता. त्यानंतर, आता राज ठाकरेंनीही चंपा म्हणून पुणेकरांना इशारा दिला.