चंद्रकांत पाटलांनी एका दिवसांत मिळवलं पदवी प्रमाणपत्र; ठाकरे गटाचा दावा, काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 01:39 PM2023-04-13T13:39:45+5:302023-04-13T13:40:53+5:30
विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. परंतु या खात्याच्या मंत्र्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप करण्यात आला.
मुंबई - राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अलीकडेच अयोध्या बाबरी आंदोलनावरून चंद्रकांत पाटलांनी केलेलं विधान वादात सापडले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने पाटलांना टार्गेट करत थेट त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. आता ठाकरे गटाच्या युवासेनेनं राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पत्र पाठवून मुंबई विद्यापीठातील मनमानी कारभारावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे.
युवासेनेने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेची परीक्षा बुधवारी १२ एप्रिल २०२३ पासून सुरू झाली परंतु सदर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र मंगळवारी ११ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी देण्यात आले. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची अत्यंत महत्त्वाची अभ्यासाची वेळ वाया गेली. राज्य सामाईक परीक्ष कक्षाकडून MBA प्रवेश परीक्षा घेण्यात आली. त्यात परीक्षा केंद्र देण्यात गोंधळ करण्यात आला. त्यानंतर १५० मिनिटांची परीक्षा काही विद्यार्थ्यांची १८० मिनिटे घेण्यात आली. अशा विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. परंतु या खात्याच्या मंत्र्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप करण्यात आला.
त्याचसोबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न सिद्धार्थ महाविद्यालयातून १९८० मध्ये उत्तीर्ण झाले, त्यांनी त्यांचे पदवी प्रमाणपत्र १९८७ साली घेतले होते. परंतु हे गहाळ झाल्यामुळे नक्कल प्रमाणपत्र विद्यापीठाची आवश्यक प्रक्रिया न करता फक्त १ दिवसांत २३ मार्च २०२३ रोजी आपल्या पदाचा दबाव टाकून घेतले. त्याचवेळी अनेक विद्यार्थी एक महिन्यापूर्वी अर्ज करुनही प्रमाणपत्र मिळालेले नाही याचा अर्थ मंत्र्यांना एक न्याय आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का? असा सवाल युवासेनेचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी विचारला आहे.
दरम्यान, या सर्वबाबी लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री त्यांचे खाते सांभाळण्यास सर्वप्रकारे अपयशी ठरले आहेत. परंतु आपल्या खात्याचा गैरवापर स्वत:करिता केला आहे. तरी चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करावे आणि समस्त विद्यार्थी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी युवासेनेने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.