“पक्ष फोडायचे संस्कार नाहीत अन् स्वभावही नाही”; सुप्रिया सुळेंना बावनकुळेंचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 04:14 PM2023-08-24T16:14:30+5:302023-08-24T16:15:48+5:30
Chandrashekhar Bawankule Replied Supriya Sule: एकनाथ शिंदे मर्द मराठा नेते असून, हिंदुत्वाची साथ धरली. तर अजित पवारांनी देशाच्या कल्याणासाठी मोदींना साथ दिली, असे चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले आहे.
Chandrashekhar Bawankule Replied Supriya Sule: अजित पवार बंडखोरी करत सत्तेत सहभागी झाले आणि उपमुख्यमंत्री होत अर्थ खात्याचा कार्यभारही घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. या घडामोडीनंतर शरद पवार गटाकडून भाजपवर सातत्याने टीका होताना दिसत आहे. यातच सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केलेल्या टीकेचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेत सुनावले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा भाजपचा हा पहिलाच प्रयत्न नाही. याआधीही त्यांनी तीन वेळा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. आधीच्या दोन वेळेला यश आले नाही. पण तिसऱ्यावेळी यश आले. तसेच भाजपचे १०५ आमदार कष्टाने निवडून आले त्यांच्याबाबत मला वाईट वाटते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.
आम्ही कोणाचाही पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नाही
आम्ही कोणाचाही पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नाही, आमचा तो स्वभाव नाही, संस्कार नाही, ज्यांचे संस्कार आहे ते देशाला माहिती आहे. महाराष्ट्राला माहिती आहे, त्यांचे संस्कार त्यांना लखलाभ. ज्यांनी जीवनभर पक्ष फोडण्याचे राजकारण केले. ते आमच्यावर बोलत आहेत, खरेतर सुप्रिया सुळे आमच्या आदरणीय आहेत, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.
आगामी काळात शरद पवार यांचे मन परिवर्तन होईल
स्वतंत्र्यानंतर इतिहास पहा काय-काय झाले महाराष्ट्रात. पक्ष फोडून कोणी सत्ता मिळवली. एकनाथ शिंदे मर्द मराठा नेते आहेत. त्यांनी हिंदुत्वाची साथ धरली आहे. तर अजित पवार यांनी देशाच्या कल्याणासाठी मोदींना साथ दिली आहे. शरद पवारांचे घर फुटले कारण ते घर सांभाळू शकले नाहीत. सुप्रिया सुळे आमच्यावर आरोप करत आहेत. मात्र मला हा विश्वास आहे की आगामी काळात शरद पवार यांचे मन परिवर्तन होईल आणि ते मोदींना पाठिंबा देतील, असा पुनरुच्चार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.