सत्ताबदलाचा मराठी विकासाला फटका? अनेक प्रकल्पांना स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 06:00 AM2020-02-05T06:00:00+5:302020-02-05T06:00:05+5:30
राज्य मराठी विकास संस्था या अनुभवाचा ठरली पहिला बळी
पुणे : राज्यातील सत्ताबदलाचा फटका शासकीय संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या चांगल्या उपक्रमांना बसतो. राज्य मराठी विकास संस्था या अनुभवाचा पहिला बळी ठरली आहे. संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘रंगवैखरी’ स्पर्धेबरोंबरच आता लोकसाहित्य अभ्यासक सरोजिनी बाबर तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त घेण्यात येणाऱ्या अनुक्रमे लोकसाहित्य आणि लोककला सादरीकरण व शाहिरी स्पर्धा प्रकल्पांना देखील स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.
1 मे 1992 साली स्थापन झालेल्या राज्य मराठी विकास संस्थेला 2010 पासून पूर्णवेळचा संचालक नव्हता. साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांकडे दोन वर्षे प्रभारी संचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 2012 नंतर आत्तापर्यंत वरिष्ठ संशोधन साहाय्यक पदावरील व्यक्तींकडे प्रभारी संचालक म्हणून काम सोपविण्यात आले . राज्यात महाआघाडीचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद काटीकर यांच्यानंतर आता साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांच्याकडे संस्थेचा प्रभारी कारभार सोपवण्यात आला आहे. मात्र संचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रकल्पांनाच स्थगिती देण्याचा सपाटा लावण्यात आला. पहिला घाव बसला तो तीन वर्षे सुरू असलेल्या ‘रंगवैखरी’ स्पर्धेला. ऐन प्राथमिक फेरीच्या तोंडावर स्पर्धेला स्थगिती देण्यात आली. या स्पर्धेत जवळपास 85 संघ सहभागी झाले होते. त्यानंतर लोकसाहित्य अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या अनुक्रमे लोकसाहित्य आणि लोककला सादरीकरण व शाहिरी स्पर्धा प्रकल्पांवर देखील संक्रांत ओढवली. डिसेंबरमध्ये सरोजिनी बाबर लोकसाहित्य स्पर्धा होणार होती. त्यासाठी राज्यभरातून अर्ज आले होते. त्याचे पुढे काय झाले? हे सांगण्यात आलेले नाही. येत्या मार्चमध्ये शाहिरी स्पर्धां घेण्यात येणार होत्या. या स्पर्धेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय जानेवारीमध्ये मराठी भाषा पंधरवडाही साजरा केला जातो. मात्र त्याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. याशिवाय मराठी स्पेलचेकर संबंधी करार होणार होता. तो देखील झालेला नाही.
रेल्वेतील वाचनयात्रा देखील बंद करण्यात आली आहे. फिरते वाचनालय अशी या ‘वाचनयात्रे’ची संकल्पना होती. या उपक्रमांतर्गत संस्थेचे वाचनदूत ठराविक पुस्तके घेऊन रेल्वेच्या या डब्यांमध्ये फिरतात. ही सुविधा पूर्णपणे मोफत देण्यात येते. हा प्रकल्प पुणे-मुंबई मार्गावरील दख्खनची राणी आणि मुंबई-नाशिक मार्गावरील पंचवटी एक्सप्रेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत होता. वाचनाची परंपरा वाढावी आणि ती रुजावी यासाठी हा प्रकल्प डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी म्हणजेच वाचन प्रेरणादिनाच्या निमित्ताने सुरु करण्यात आला. येत्या काळात आणखी १६ मार्गांवरील रेल्वेंमध्ये ही योजना सुरू करण्याचे नियोजन करण्यात होते. मात्र इतक्या चांगल्या उपक्रमाला सुद्धा खीळ बसली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, मीनाक्षी पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. मात्र संस्थेच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याचे संस्थेकडून जुजबी कारण सांगण्यात आले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------