‘जलसंपदा’ अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By admin | Published: April 4, 2015 04:14 AM2015-04-04T04:14:26+5:302015-04-04T04:14:26+5:30
पाणीपुरवठा योजनेचे बिल मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपये घेतल्याप्रकरणी पाटबंधारे विभागातील दोन अधिकारी आणि मुख्य ठेकेदाराविरुद्ध शहर
सातारा : पाणीपुरवठा योजनेचे बिल मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपये घेतल्याप्रकरणी पाटबंधारे विभागातील दोन अधिकारी आणि मुख्य ठेकेदाराविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सदंर्भात उपठेकेदाराने तक्रार नोंदविली असून पैसे घेऊनही अंतिम बिल दिले नाही, असे त्याने म्हटले आहे.
उपठेकेदार दादासाहेब अण्णा वडर (चव्हाण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धोम पाटबंधारे विभागातील शाखा अभियंता श्रीराम जाधव आणि उपअभियंता परशुराम कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कामाची पूर्ण रक्कम उपठेकेदाराला दिली नसल्याबद्दल दत्तसाई कन्स्ट्रक्शनचा राजू पवार याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, राजू पवार याच्या लायसेन्सवर केंजळ चाहूर (देशमुखनगर, ता. सातारा) येथील पाणीपुरवठा योजनेचे काम या अधिकाऱ्यांनी आपल्याला दिले होते. या कामाचे अंदाजपत्रक ३२ लाख ९८ हजार ९६६ रुपयांचे होते. हे काम आपण फेब्रुवारी २०१३ मध्ये सुरू केले. कामासाठी अॅडव्हान्स म्हणून धोम विभागाने २० लाख २७ हजारांची रक्कम मंजूर केली होती. त्यातून विविध करांची कपात करून राजू पवार याच्या खात्यावर १८ लाख ५० हजारांची रक्कम जमा झाली. एप्रिल २०१३ मध्ये राजू पवारने आपल्या मामाचा मुलगा सागर याच्या बँक खात्यावर १६ लाख ४४ हजार रुपये जमा केले आणि उरलेले दोन लाख सहा हजार नंतर देईन, असे तोंडी सांगितले. २०१४ मध्ये योजनेचे काम आपण पूर्ण केले व अंतिम बिल म्हणून दोन लाख ७९९ रुपये मंजूर झाले. आॅक्टोबर २०१४ पासून उर्वरित सात लाख ७९ हजार रुपयांसाठी राजू पवारकडे आपण मागणी करीत असून, उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)