मुंबई - राज्याचा २०१९-२० चा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला आहे. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या या अर्थसंकल्पात लोकाभिमुख योजना आणि सवलतींचा पाऊस पडला आहे. यावरूनच, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फडणवीस सरकराने घोषणांचा 'अवकाळी' पाऊस पाडला असल्याचा खोचक टोला भुजबळ यांनी लगावला.
२०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. यावरूनच, भुजबळ यांनी फडणवीस सरकारवर टीका केली आहे. विधानसभेत मांडण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून घोषणांचा 'अवकाळी' पाऊस असल्याचा, टोला भुजबळ यांनी लगावला आहे.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना, त्या आधीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटर अर्थसंकल्पाचे मुद्दे तयार करून ग्राफीक्ससह प्रसिद्ध झाल्याने विधानपरिषदेत गोंधळ उडाला. त्यांनतर, विरोधकांनी सभात्याग करत सभागृह सोडले. मात्र, त्यांनतर ही मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडले. यावरून भुजबळ यांनी सरकारवर निशाना साधला आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या अनुपस्थित अर्थसंकल्प मांडला गेल्याने सभागृहाची परंपरा पायदळी तुडवली गेल्याचे भुजबळ म्हणाले.