मुंबई : दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार तसेच कलिना येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) शुक्रवारी रात्री उशिरा हिरवा कंदील दाखविला आहे. गृह खात्याची धुरा सांभाळत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून अशी मंजुरी मिळण्यासाठी एसीबीला चार महिने प्रतीक्षा करावी लागली. कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात भुजबळ सार्वजनिक बांधकाममंत्री असताना दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे बांधकाम झाले. त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास एसीबीमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राथमिक तपासानंतर जूनमध्ये एसीबीने भुजबळांवर गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे कलिना येथील भूखंड खरेदी गैरव्यवहारप्रकरणीही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी एसीबीने जुलैच्या अखेरीस गृह विभागाकडे मागितली होती.राजकीय द्वेषापोटी आरोप..आपल्यावरील सर्व आरोप हे बिनबुडाचे व राजकीय द्वेषातून करण्यात आले आहेत. याबाबत कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. आपण तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले असून, आपला न्यायसंस्थेवर विश्वास आहे. म्हणूनच यातून निर्दोष सुटू, याची मला खात्री आहे. - छगन भुजबळ,माजी सार्वजनिक बांधकाममंत्री
छगन भुजबळ आणखी अडचणीत
By admin | Published: December 06, 2015 3:36 AM